सीपीएड् कॉलेज मैदानावर आयोजन : स्टॉल बुकिंगला सुरुवात
बेळगाव : बेळगावकरांच्यादृष्टीने अतिशय भव्य उपक्रम दरवर्षी रोटरी क्लब बेळगावच्यावतीने आयोजित केला जातो, तो म्हणजे अन्नोत्सव. यंदा हा उत्सव 5 ते 14 जानेवारीपर्यंत सीपीएड् कॉलेजच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगावचे चेअरमन रो. जयदीप सिद्धण्णावर यांनी दिली. ते म्हणाले, अन्न ही प्रत्येकाची गरज आहे. वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रकारची खाण्या-पिण्याची आवड असते. बेळगावात सर्व समाजाचे आणि देशाच्या विविध भागातून आलेले लोक राहत असल्याने त्यांची खाण्या-पिण्याची आवडसुद्धा वेगवेगळी आहे. या सर्व समाजाच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या आवडीनुसार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 1997 मध्ये रोटरी क्लबने ‘अन्नोत्सव’ उपक्रमाची सुरुवात केली. रोटरीचे अविनाश पोतदार यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाने यशाची उंची गाठत अन्नोत्सवला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
प्रख्यात सेलिब्रिटीजकडून कौतुक
संजीव कपूर, विठ्ठल कामत, विष्णू मनोहर, सई ताम्हणकर, गायक अमिता गुप्ता अशा प्रख्यात सेलिब्रिटीजनी भेट देऊन अन्नोत्सवाचे कौतुक केले आहे. अन्नोत्सव हा रोटरी क्लबचा उपक्रम असला तरी बेळगावकरांच्या आवडीचा उत्सव झाला आहे. या उत्सवात देशाच्या विविध भागातून 200 हून अधिक स्टॉल्स सहभागी होणार असून त्यामध्ये काश्मीरपासून जयपूरपर्यंत, गोवा, कोल्हापूर, सातारा, पुणे, नवी दिल्ली येथील प्रख्यात खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा सहभाग राहणार आहे. यंदाचे अन्नोत्सवाचे 26 वे वर्ष असून या इव्हेंटचे चेअरमन म्हणून रोटे. डॉ. संतोष पाटील व सुनिष मैत्रानी आणि कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर म्हणून रो. तुषार पाटील कार्यरत आहेत.
याही वर्षी अन्नोत्सवमध्ये 200 स्टॉल्सबरोबरच भव्य स्टेजची उभारणी करण्यात येणार आहे. या स्टेजवर रोज वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन पार्किंगसाठी भव्य सोय करण्यात आली आहे. याशिवाय स्टॉल ओनरसाठी वेगळ्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वात मोठ्या एलईडी स्क्रीनबरोबरच 15 मोठे कियाक्स बसविले जाणार आहेत. स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी प्रसाधन व्यवस्था करण्यात येणार असून सुरक्षिततेच्यादृष्टीने संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे.
दोन लाख लोक भेटीची अपेक्षा
आजवर रोटरी क्लबने शाळा, स्वच्छतागृह, अॅम्ब्युलन्स नेत्रपेढी, त्वचा पेढी, डायलिसिस केंद्र, पोलिओ व्हॅक्सिनेशनसाठी रेफ्रिजरेटर आणि आर्टिफिशियल लिम्बससाठी अर्थसाहाय्य केले आहे. यंदाच्या या अन्नोत्सवातून मिळणारा निधी संपूर्णत: बेळगावसाठीच खर्च केला जाणार आहे. अनेक लोकोपयोगी उपक्रम त्यातून राबविले जाणार आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. दहा दिवसात दीड ते दोन लाख लोक भेट देतील, अशी अपेक्षा आहे. स्टॉलचे बुकिंग 15 नोव्हेंबरपासून सुरू असल्याचे कळविण्यात आले आहे.









