विविध पुरस्कारांचे होणार वितरण
मडगाव : गोमंत विद्या निकेतन या संस्थेचा 111वा वर्धापनदिन समारंभ शनिवार दि. 25 व रविवार दि. 26 रोजी यंदा भरगच्च कार्यक्रमांनिशी साजरा होणार असून यंदा या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून दै. लोकसत्ताचे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकूंद संगोराम यांची खास उपस्थिती लाभणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जर्नादन वेर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकारितेशिवाय संगीताचा वारसा त्यांचे पिताश्री डॉ. श्रीरंग संगोराम यांच्याकडून लाभलेले संगोराम पुण्यातील प्रसिद्ध सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या कार्यकारी मंडळावर गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. अलिकडेच त्यांचे सूरश्रेष्ठ हे संगीतविषयक पुस्तक प्रकाशित झाले आहे.
दि. 25 रोजी सायं. 5.30 वा. संस्थेच्या फॉमेंतो एम्फीथिएटरमध्ये यंदाच्या संस्थेच्या पुरस्कारांचे वितरण कविश्रेष्ठ प्रकाश होळकर यांच्याहस्ते होणार आहे. विशेष म्हणजे होळकर हे यंदाच्या संस्थेच्या प्रतिष्ठेच्या कै. दामोदर अच्युत कारे स्मृती ‘गोमंतदेवी’ या पुरस्काराचे मानकरी आहेत. गोव्यातील नवोदित, होतकरू साहित्यिकांना या कार्यक्रमात त्यांच्या सहवासाची आणि मार्गदर्शनाची पर्वणी लाभणार आहे. वर्धापनदिन समारंभाचा मुख्य कार्यक्रम रविवार दि. 26 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वा. संस्थेच्या फॉमेंतो एम्फीथिएटरमध्ये होणार असून प्रमुख पाहुणे संगोराम यांच्या हस्ते संस्थेच्या चार वार्षिक पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यंदाच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे मानकरी-संस्था पुढील प्रमाणे आहेत. अभिजीत प्रभुदेसाई (केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार), चेतना चेरिटेबल ट्रस्ट (काशिनाथ दामोदर नायक स्मृती सामाजिक कृतज्ञता पुरस्कार-संस्था), प्रकाश होळकर (कविवर्य दामोदर अच्युत कारे स्मृती गोमंतदेवी पुरस्कार), श्रीमती वर्मा डिमॅलो (पिरूबाय दलाल स्मृती ‘स्वयंसिद्धा’ पुरस्कार). पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष सलील कारे व खजिनदार राजेश नाईक उपस्थित होते.









