पणजी : भाटले-पणजी येथील श्री सटी भवानी देवस्थानचा 44 वा वर्धापनदिन व पालखी सोहळा शनिवार दि. 25 फेब्रु. ते गुऊवार दि. 2 मार्चपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. भाटले येथील श्री सटी भवानी, श्री भवानी शंकर, श्री महागणपती व श्री नागनाथ देव या पंचदेवतांच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार दि. 25 रोजी पहाटे अभिषेक, गणपतीपूजन, पुण्याहवाचन, देवताप्रार्थना, रूद्रहवन, महागणपती सहस्त्र मोदक हवन व पूर्णाहुती विधी झाल्यानंतर 12.30 वा. आरती, तीर्थप्रसाद व सायं. 7 वा. नामवंत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रविवार दि. 26 रोजी गणपतीपूजन व इतर धार्मिक विधी होऊन आरती, तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होईल. सायं. 7 वा. भजनाच्या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे.
सोमवार दि. 27 रोजी सकाळपासून धार्मिक विधींना प्रारंभ होणार. त्यात गणपतीपूजन, कलावृद्धी होम, श्री सूक्तहोम आदी विधी होऊन दुपारी 12.30 वा. आरती व महाप्रसाद झाल्यानंतर सायं. 4 वा. श्रींच्या पालखीतून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. यावेळी घरोघरी श्रींचे आगमन होऊन सुवासिनींकडून ओट्या भरल्या जाणार आहेत. सदर पालखी पहाटेपर्यंत फिरून परत देवालयात श्रींचे आगमन होणार आहे. मंगळवार दि. 28 रोजी धार्मिक विधी होऊन रात्री 8 वा. श्रींच्या फळांची पावणी होऊन रात्री 10 वा. सुवासिनींच्या जोडव्यांचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. 1 मार्च रोजी सकाळी श्रींची पूजा-अर्चा, आरती, तीर्थप्रसाद व रात्री 8 वा. श्रींच्या फळांची पावणी होऊन 10 वा. ॐकार कलाबहार, करमळी नाट्यासंस्थेचे कोकणी नाटक ‘आंगार कुत्रो मोगान भित्रो’ सादर होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन शेखर उजगांवकर यांनी केले आहे. गुऊवार दि. 2 रोजी भाटले स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबतर्फे दु. 3 वा. श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच महापूजेनंतर सायं. 6.30 वा. केरी-शिरोली येथील संत फटी रखुमाई दिंडी पथकातर्फे आकर्षक दिंडी कार्यक्रम होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.









