तामिळनाडू निवडणुकीतही सांभाळणार जबाबदारी : शाह
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडूत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई हे लवकरच राष्ट्रीय भूमिकेत दिसतील, तसेच ते तामिळनाडूतही महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील असे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. 2026 मध्ये तामिळनाडूत रालोआ सरकार स्थापन होणार असून भाजप सक्रीय भूमिका बजावणार आहे. तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांना भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी सोपविली जाईल. तसेच ते तामिळनाडूच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावत राहतील असे शाह यांनी एका मुलाखतीत सांगितले.
अण्णामलाई यांच्या संघटनात्मक क्षमतांचा वापर राष्ट्रीय स्तरावरही भाजप करणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून अण्णामलाई यांनी अत्यंत कौतुकास्पद कार्य केले असल्याचे वक्तव्य शाह यांनी केले आहे. तामिळनाडूत रालोआ सरकार सत्तेवर येणार असून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अण्णाद्रमुकचा असेल असेही त्यांनी म्हटले आहे. परंतु त्यांनी अण्णाद्रमुकचे महासचिव ई. पलानिस्वामी यांचे नाव घेतले नाही. यातून अण्णाद्रमुकमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अद्याप स्पष्टता नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तामिळनाडूत द्रविड पक्षांचे वर्चस्व
शाह यांचे हे वक्तव्य राजकीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तामिळनाडूत 1967 पासून आतापर्यंत कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला सत्तेत थेट भागीदारी मिळालेली नाही. कारण तेथे द्रविड पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. भाजप राज्यातील सत्तेत सामील झाल्यास हा एक ऐतिहासिक राजकीय बदल ठरणार आहे. भाजप आता तामिळनाडुत केवळ एक सहकारी पक्ष म्हणून राहू इच्छित नाही, तर सत्तेत सक्रीय भागीदारीच्या दिशेने सरकारत आहे आणि अण्णामलाई या रणनीतिचे मध्यवर्ती चेहरे ठरू शकतात.









