वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
16 जानेवारीपासून मेलबर्न येथे सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत भारताची अनुभवी महिला टेनिसपटू सानिया मिर्झा महिला दुहेरीत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत महिला दुहेरीच्या प्रकारात सानियाची पार्टनर कझाकस्तानची ऍना डॅनिलिना राहणार आहे.
2023 च्या टेनिस हंगामातील पहिली ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा असून सानियाने मानांकनात 11 व्या स्थानावर असलेल्या कझाकस्तानच्या डॅनिलिना समवेत खेळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सानियाचे वडील आणि प्रशिक्षक इम्रान मिर्झा यांनी दिली. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सानिया महिला दुहेरी तसेच मिश्र दुहेरीत खेळणार आहे. पण सानियाने मिश्र दुहेरीतील आपला साथीदार घोषित केलेला नाही. डब्ल्यूटीएच्या दुहेरीच्या मानांकनात सानिया 25 व्या स्थानावर आहे. 2022 च्या विम्बल्डन स्पर्धेत सानियाने मिश्र दुहेरीत पेव्हिक समवेत उपांत्य फेरी गाठली होती. 36 वर्षीय सानियाने तब्बल पाच वर्षानंतर विम्बल्डन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. सानियाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत दोनवेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत दोन अजिंक्यपदे मिळवली आहेत. तिने महिला दुहेरीत मार्टिना नवरातिलोव्हासमवेत तर मिश्र दुहेरीत महेश भूपतीसमवेत 2009 साली अजिंक्यपदे मिळवली होती.









