कोल्हापूर प्रतिनिधी
रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे आण्णा भाऊ साठे हे पहीले लोकशाहीर असल्याचे उद्गार प्राध्यापक प्रभाकर निसर्गंध यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या साहीत्यिक प्रवासामध्ये अण्णांनी श्रमिक, कष्ठकरी लोकांची भूमिका त्यांच्या कथा, कादंबऱ्यांमध्ये प्रभावी लेखन करून समाजापुढे आणले असून समाजाच्या विकासामध्ये श्रमिक, कष्ठकरी घटकांचा खूप मोठा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कोल्हापूरात सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात आज साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात आण्णांच्या साहीत्यिक आणि चळवळीच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकण्यासाठी पेठ वडगाव येथिल विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. प्रभाकर निसर्गंध यांचे व्याख्यान झाले.
यावेळी बोलताना प्रा. निसर्गंध म्हणाले, “आण्णा भाऊ साठेंना जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण ते खचले नाहीत. शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली.”
पुढे बोलताना ते म्हणाले “रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते. ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले. ‘फकीरा’ या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला.त्यांनी ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे त्यांनी रचले आहेत. चळवळीत असताना आण्णांनी श्रमिक,कष्ठकरी लोकांची भूमिका त्यांच्या कथा, कादंबऱ्यांमध्ये प्रभावी लेखन करून समाजापुढे आणले असून समाजाच्या विकासामध्ये श्रमिक, कष्ठकरी घटकांचा खूप मोठा आहे” असे विचार त्यांनी मांडले.
यावेळी बोलताना समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी “आण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. ज्यानी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले. तसेच त्यांनी जातीव्यवस्था, गरीबी आणि भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. यासाठी शिक्षण घेणे आवश्यक असून ते आचरणात आणणे आवश्यक आहे” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला बी. सी. खाडे शिक्षण शास्त्र महाविद्यालय तसेच महिला शिक्षण शास्त्र महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थित होते.









