वृत्तसंस्था/ कोपेनहॅगेन
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या रविवारी येथे झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत दक्षिण कोरियाची टॉप सिडेड महिला बॅडमिंटनपटू अॅन से यंगने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावताना कॅरोलिना मॅरीनचा पराभव केला. यंग ही विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद मिळविणारी अॅन यंग ही कोरियाची पहिली विश्व चॅम्पियन ठरली आहे.
रविवारी या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 21 वर्षीय टॉप सिडेड अॅन यंगने माजी विश्व विजेती कॅरोलिना मॅरीनचा 21-12, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. सदर स्पर्धेमध्ये यंगने गेल्या शनिवारी उपांत्यफेरीत टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती शेन फेईचा पराभव केला. स्पेनच्या मॅरीनच्या हस्ते यंगला सुवर्णपदक देण्यात आले. स्पेनच्या मॅरीनने 2016 साली ऑलिंपिक सुवर्णपदक पटकाविले होते. यंग आणि मॅरीन यांच्यातील अंतिम सामना 42 मिनिटे चालला होता. गेल्या 30 वर्षांच्या कालावधीत विश्व चॅम्पियन्स ठरणारी यंग ही पहिली दक्षिण कोरियाची बॅडमिंटनपटू आहे. या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत थायलंडच्या के. व्हिटीडेसमने पुरूष एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना अंतिम सामन्यात जपानच्या नाराओकाचा 19-21, 21-18, 21-7 असा पराभव केला. पुरूष एकेरीचे या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा व्हिटीडेसम हा थायलंडचा पहिला बॅडमिंटनपटू आहे.









