कॉन्ट्रॅक्टरने एन. एच. अधिकाऱ्यांना दिले मागणीचे निवेदन
वार्ताहर/रामनगर
बेळगाव गोवा महामार्गावरील खानापूरपासून अनमोड घाट मार्गापर्यंत रस्त्याचे काम गेल्या आठ वर्षापासून संतगतीने चालू आहे. गेल्या आठ वर्षात काम चालू केल्यापासून सदर महामार्ग कारवार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून रस्ताकाम करण्यासाठी चार वेळा बंद ठेवला आहे. आता पुन्हा मार्ग बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. सदर रस्त्याचे काम 2017 साली सुरू करण्यात आले होते. 2017 मध्ये अनमोड घाटात काम करण्यासाठी व्यत्यय येऊ नये या दृष्टिकोनातून दिलीप बिल्डकॉन कंपनीने एक वर्षाच्या कालावधीसाठी गोवा-बेळगाव महामार्गावरील अनमोड घाट बंद करण्याची निविदा कारवार जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी एक वर्षाच्या कालावधीसाठी ‘बंद’चा आदेश सुनावला होता. परंतु अनमोड घाटातील कामच पूर्ण न झाल्याने पुन्हा एक वर्षाचा कालावधी वाढवून घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा 2021 साली काम करण्यासाठी पुन्हा कारवार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रस्ता बंद करण्यात आला होता.
2023 साली तिनईघाट देवळी रेल्वेगेट नजीक लोहमार्ग डब्बल करण्यासाठी रेल्वे कॉन्ट्रॅक्टरने तसेच रेल्वे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना बंदचे निवेदन दिल्याने पुन्हा 21 दिवसांसाठी मार्ग बंद करण्यात आला होता. त्यावेळी कारवार जिल्हाधिकाऱ्यांने एन. एच. अधिकाऱ्यांनाही सूचना देऊन रेल्वे विभाग तसेच एन. एच. विभागाला एकाचवेळी बंदचा आदेश देण्यात येईल व यादरम्यान कॅसरलॉक क्रॉसनजीक ब्रिजचे कामही करण्याची सूचना दिली होती. 2024 साली पावसात हत्ती ब्रिजनजीक पाणी तुंबल्याने पुन्हा कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी मार्ग बंदचा आदेश दिला. त्यानंतरही अवजड वाहनांना अनमोड मार्ग बंदच राहिला. वारंवार बंदमुळे प्रवाशी, वाहनधारक, विद्यार्थी तसेच या रस्त्यावर अवलंबून उपजीविका करणाऱ्या व्यावसायिकांना फार मोठा मनस्ताप झाला होता. अद्यापही या रस्त्याची परिस्थिती जैसे थेच आहे.
मार्ग बंदची गरज नाही
आता पुन्हा कॅसलरॉक क्रॉसनजीकच्या ब्रिजचे काम करण्यासाठी तीन महिन्यासाठी महामार्ग बंद हवा असल्याची निविदा एन. एच. अधिकाऱ्यांना दिली आहे. परंतु अनमोड मार्ग पुन्हा बंद करणाऱ्या प्रस्तावाला सर्व थरातून विरोध दर्शवण्यात येत आहे. सदर मार्ग बंद करून बनवण्यात येणाऱ्या पुलाची या ठिकाणी आवश्यकताच नसल्याचेही एन. एच. अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कॉन्ट्रॅक्टरला मार्च अखेरपर्यंत सदर मार्गाचे काम करण्याची मुभा आहे. परंतु मार्च अखेर सदर मार्ग पूर्ण होण्याची शक्यताही नाकारण्यात येत आहे.









