जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : अवजड वाहनांसाठी सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी
वार्ताहर /रामनगर
अनमोड घाटमार्ग सर्व वाहनांसाठी खुला करण्याबाबतचा आदेश मंगळवारी कारवारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. या मार्गावरून अवजड वाहनांना सायंकाळी सात ते सकाळी सहापर्यंत परवानगी देण्यात आल्याची माहिती कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या चार वर्षांपासून अनमोड महामार्गाचे काम करणार असल्याचे कारण देत तसेच रस्त्याचे काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण न येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड घाटमार्ग एक वर्षाच्या कालावधीसाठी सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा आदेश दिला होता. तसेच या रस्त्याचे काम वन्यजीव प्रकल्पात येत असल्याने वन्यजीव प्रकल्पात काम करण्यासाठी न्यायालयाने आक्षेप घेतल्याने काही वर्षे या मार्गाचे काम बंद होते. त्यामुळे या मार्गाचे काम अर्धवट राहिले होते. त्या स्थितीतच काही दिवस अनमोड घाटमार्गावरून अवजड वाहने वगळता सर्व वाहने धावू लागली. परंतु अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आल्यामुळे अवजड वाहनधारकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकारी तसेच वनविभाग व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी करून अवजड वाहनांना हा मार्ग खुला करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र दिले. तसेच मंगळवार दि. 16 रोजी अनमोड घाटमार्ग सर्व वाहनांसाठी खुला करण्याचा आदेश जारी केला आहे. तर अवजड वाहनांना सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत परवानगीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









