रेल्वे विभागातर्फे कामाला सुरुवात : 25 जानेवारीपर्यंत काम राहणार सुरू, काम वेळेत संपवण्याचा निर्धार
वार्ताहर / रामनगर
देवळी येथील रेल्वेगेट येथे तिनईघाट येथून येतेवेळी जास्त प्रमाणात उतार असल्याने अनेक अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन रेल्वेगेटला ठोकरण्याचे प्रमाण वाढत असल्याने या ठिकाणी उताराची क्षमता कमी करण्यासाठी 80 मीटरचे सिमेंटीकरण करण्याची गरज आहे. यासाठी रेल्वे विभागाने 20 दिवसांचा बंदचा कालावधी मागितला होता. यामुळे कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 5 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत बंदचा आदेश दिला आहे.
या आदेशामुळे रामनगर येथून गोव्याला जाणारी छोटी वाहने रामनगर पोलिसांकडून तिनईघाट, मारसंगाळमार्गे अनमोडला वळविली आहे. तर गोवा येथून रामनगरला येणाऱ्या वाहनांना कॅसरलॉक, चांदेवाडीमार्गे वळविण्यात आली आहे. गोवा येथून बेळगावला जाणाऱ्या वाहनांना अनमोड-हेमाडगा-खानापूरमार्गे पाठविण्यात येत आहेत. अवजड वाहनांना चोर्लामार्गे अथवा अळणावर-हल्याळ मार्ग देण्यात आला आहे. रेल्वे विभागातर्फे सदर काम रात्रंदिवस चालू राहणार आहे. 5 ते 6 दिवसात काम पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित दिवस सिमेंटीकरणाच्या क्विरिंगसाठी लागणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अवजड वाहनांना 20 दिवस मनस्ताप सहन करावा लागेल. त्यानंतर मात्र पुन्हा बंदचा आदेश निघणार नाही. तसेच अवजड वाहनांनाही पूर्ण वेळ सोडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अनमोड घाटमार्ग बंदचा निर्णय चुकीचा : अवजड वाहतूकदारांचा आरोप
रामनगर : गोवा-बेळगाव महामार्गावरील अनमोड घाटमार्ग शुक्रवार दि. 5 जानेवारीपासून दि. 25 जानेवारीपर्यंत रेल्वे डबलिंग कामासाठी बंद ठेवण्याचा निर्णय कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक दिल्याने अवजड वाहनधारकांना मोठा मनस्ताप झाला आहे. यामुळे अचानक दोन दिवसांपूर्वी कारवार जिल्हाधिकाऱ्यांचा बंदबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचा आरोप अवजड वाहनधारक तसेच ट्रान्सपोर्टकडून करण्यात येत आहे. कारण यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत या भागातील ट्रान्सपोर्टबरोबर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु कोणत्याही ट्रान्सपोर्टरशी चर्चा न करता अचानक दोन दिवसाच्या कालावधीत निर्णय दिल्याने अनेक कॉन्ट्रॅक्टर व गोवा राज्याबरोबर इतर राज्यातील ट्रान्सपोर्टस्बरोबर अनेक प्रकारचे एग्रीमेंट केले गेल्याने अनेक ट्रान्सपोर्टधारक अडचणीत सापडले आहेत. किमान आठ ते दहा दिवसाचा कालावधी देणे गरजेचे होते, असे अवजड वाहनधारकांकडून सांगण्यात येत आहे. तर अनमोड घाटातून बसही बंद केल्याने रोज गोवा येथे जाणाऱ्या कामगार वर्गांना तसेच बांबोळी येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना फार मोठा फेरा मारून जावा लागणार आहे.









