मार्ग खुला केल्याने आजचे रास्तारोको आंदोलन मागे : प्रवाशांतून समाधान
वार्ताहर/रामनगर
अनमोड घाटातील गोवा हद्दीतील 4 जुलै रोजी रस्ता कोसळल्याने 5 जुलैपासून 2 सप्टेंबरपर्यंत अनमोड घाटमार्ग अत्यावश्यक सेवा वगळून इतर वाहनांना मडगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आला होता. तर कोसळलेल्या ठिकाणी काम पूर्ण न झाल्याने त्यानंतर आणखीन मुदतवाढ करण्याची मागणी गोवा पीडब्ल्यूडी विभागतर्फे करण्यात आली होती. परंतु वाहनधारक तसेच नागरिकांनी मुदतवाढ न देण्याबाबत मडगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्याने 12 सप्टेंबररोजी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड घाटमार्ग फक्त सहा चाकी वाहनांना खुला करण्याची अनुमती दिली होती. त्यामुळे सहाचाकीहून अधिक चाकी वाहनधारकांनी आपल्यावर अन्याय झाला आहे, असे सांगत सदर मार्ग अवजड वाहनांसाठीही खुला करून न दिल्यास दि. 20 सप्टेंबररोजी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. तर याची दखल घेऊन मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार दि. 19 रोजी अनमोड घाटमार्ग गोवा हद्दीतून सर्व वाहनांसाठी खुला केल्याबाबतचा आदेश काढला आहे. त्यामुळे 20 रोजी होणारा रास्ता रोको आंदोलन आता स्थगित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.









