वृत्तसंस्था / जेरुसेलम
भारताची महिला धावपटू अंकिता ध्यानीने येथे झालेल्या जेरुसेलम ग्रँडस्लॅम अॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 2000 मी. धावण्याच्या अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.
23 वर्षीय अंकिता ध्यानीने या स्पर्धेत महिलांच्या 2000 मी. अडथळ्याच्या शर्यतीत 6 मिनिटे 13.92 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. अंकिताने या क्रीडा प्रकारात आपल्याच देशाच्या पारु चौधरीने नोंदविलेला 6 मिनिटे 14.38 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. पुढील महिन्यात टोकियोमध्ये होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्व मानांकन कोटापद्धतीनुसार अंकिताला पात्रतेची संधी उपलब्ध झाली आहे. जेरुसेलममध्ये झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या 2000 मी. धावण्याच्या अडथळा शर्यतीत इस्रायलच्या अॅडेव्हा कोहेनने 6 मिनिटे 15.20 सेकंदांचा अवधी घेत रौप्य पदक तर डेन्मार्कच्या ज्युलेनी हिवेडने 6 मिनिटे 17.80 सेकंदांचा अवधी घेत कांस्यपदक घेतले. गेल्या महिन्यात झालेल्या विश्व विद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत अंकिता ध्यानीने या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकाविले होते.









