वृत्तसंस्था/ कोलकाता
2024-25 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरु असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर कर्णधार अंकित कुमारच्या समायोचित शतकाने हरियाणाचा डाव सावरला. या सामन्यात विद्यमान विजेत्या मुंबईने पहिल्या डावात 315 धावा जमविल्यानंतर हरियाणाने पहिल्या डावात 5 बाद 263 धावा केल्या. हरियाणाचा संघ अद्याप 52 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 5 गडी खेळावयाचे आहेत.
मुंबई संघाने 8 बाद 278 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. मात्र तनुष कोटीयनचे शतक 3 धावांनी हुकले. सुमीत कुमारने त्याचा 97 धावांवर त्रिफळा उडविला. कोटीयानच्या खेळीमध्ये 13 चौकारांचा समावेश होता. मुलानीने 10 चौकारांसह 91 धावा जमविल्या. जयंत यादवने त्याला झेलबाद केले. शार्दुल ठाकुर केवळ 15 धावा जमवित तंबूत परतला. मुंबईचा डाव 88.2 षटकात 315 धावांत आटोपला. हरियाणातर्फे सुमीत कुमार आणि कंबोज यांनी प्रत्येकी 3 तर ठकराल, चहल, जयंत यादव आणि सिंधू यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
हरियाणाच्या डावाला कर्णधार अंकित कुमार आणि लक्ष्य दलाल यांनी बऱ्यापैकी सुरुवात करुन देताना 87 धावांची भागिदारी केली. शार्दुल ठाकुरने लक्ष्य दलालला पायचीत केले. त्याने 4 चौकारांसह 34 धावा जमविल्या. यानंतर अंकित कुमारने यशोवर्धन दलालसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 81 धावांची भागिदारी केली. यशोवर्धनने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी हरियाणाची मधली फळी लवकर बाद केली. मुलानीने राणाला 3 धावांवर बाद केले. कोटीयनने सिंधूचा त्रिफळा उडविला. त्याने 2 चौकारांसह 20 धावा केल्या. अंकित कुमारने 206 चेंडूत 21 चौकारांसह 136 धावा झळकाविल्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी मुलानीने त्याला रहाणेकरवी झेलबाद केले. दिवसअखेर रोहित शर्मा 22 तर ठकराल 5 धावांवर खेळत होते. मुंबईतर्फे मुलानी आणि कोटीयान यांनी प्रत्येकी 2 तर शार्दुल ठाकुरने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – मुंबई प. डाव 88.2 षटकात सर्वबाद 315 (मुलानी 91, कोटीयन 97, रहाणे 31, दुबे 28, कंबोज, सुमीत कुमार प्रत्येकी 3 बळी), हरियाणा प. डाव 72 षटकात 5 बाद 263 (अंकित कुमार 136, लक्ष्य दलाल 34, यशोवर्धन दलाल 36, मुलानी व कोटीयान प्रत्येकी 1 बळी, ठाकुर 1-47).
विदर्भ संघ सुस्थितीत
नागपूरमध्ये सुरु असलेल्या रणजी स्पर्धेतील अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान विदर्भने आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. विदर्भने पहिल्या डावात 353 धावा जमविल्यानंतर तामिळनाडूने पहिल्या डावात 6 बाद 159 धावा केल्या आहेत.
विदर्भने 6 बाद 264 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. आणि त्यांचा पहिला डाव 353 धावांवर आटोपला. करुण नायरने 1 षटकार आणि 18 चौकारांसह 122, दानिश मालेवारने 13 चौकारांसह 75, हर्ष दुबेने 9 चौकारांसह 69 तर कर्णधार अक्षय वाडकरने 3 चौकारांसह 24 धावा केल्या. शोरेने 26 धावा जमविल्या. तामिळनाडूतर्फे सोनू यादव आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मदने 2 गडी बाद केले.
आदित्य ठाकरेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर तामिळनाडूने दुसऱ्या दिवसाअखेर पहिल्या डावात 6 बाद 159 धावांपर्यंत मजल मारली. सिद्धार्थने 2 षटकार आणि 10 चौकारांसह 65, जगदीशनने 2 चौकारांसह 22, विजय शंकरने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22 धावा केल्या. आदित्य ठाकरेने 18 धावांत 4 गडी बाद केले. भूते आणि दुबे यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. तामिळनाडूचा संघ अद्याप 194 धावांनी पिछाडीवर असून विदर्भची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.
संक्षिप्त धावफलक – विदर्भ प. डाव 121.1 षटकात सर्वबाद 353 (करुण नायर 122, मालेवार 75, हर्ष दुबे 69, सोनू यादव व विजय शंकर प्रत्येकी 3 बळी), तामिळनाडू प. डाव 46 षटकात 6 बाद 159 (सिद्धार्थ 65, आदित्य ठाकरे 4-18).
केरळ अद्याप 80 धावांनी पिछाडीवर
रणजी क्रिकेट स्पर्धेतील पुणे येथे सुरु असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जम्मू काश्मिरने केरळला पहिल्या डावात 9 बाद 200 धावांवर रोखले. तत्पूर्वी जम्मू काश्मिरने पहिल्या डावात 280 धावा जमविल्या होत्या.
जम्मू काश्मिरच्या पहिल्या डावात वाधवानने 5 चौकारांसह 48, नासिरने 3 चौकारांसह 44, नबीने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 32, लोत्राने 3 चौकारांसह 35 धावा जमविल्या. केरळतर्फे निदेशने 75 धावांत 6 तर सरवटेने 34 धावांत 2 गडी बाद केले. केरळच्या पहिल्या डावामध्ये सक्सेनाने अर्धशतक झळकाविले. त्याने 78 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 67 धावा जमविल्या. सलमान निझार 8 चौकारांसह 49 धावांवर खेळत आहे. निदेशने 6 चौकारांसह 30 तर अक्षय चंद्रनने 4 चौकारांसह 29 धावा जमविल्या. जम्मू काश्मिरच्या अकिब नबीने 36 धावांत 5 तर युधवीर सिंग आणि लोत्रा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक – जम्मू काश्मिर प. डाव 95.1 षटकात सर्वबाद 280 (वाधवान 48, नासिर 44, युधवीर सिंग 26, नबी 32, हसन 24, निदेश 6-75, सरवटे 2-34), केरळ प. डाव 63 षटकात 9 बाद 200 (जे. सक्सेना 67, सलमान निझार 49, चंद्रन 29, निदेश 30, अकिब नबी 5-36, लोत्रा 2-9).
गुजरातला 44 धावांची आघाडी
रणजी क्रिकेट स्पर्धेतील राजकोटमध्ये सुरु असेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसा अखरे गुजरातने पहिल्या डावात 4 बाद 260 धावा जमवित सौराष्ट्रवर 44 धावांची आघाडी मिळवली आहे.
सौराष्ट्रने पहिल्या डावात 216 धावा जमविल्या. चिराग जेनीने 1 षटकार आणि 11 चौकारांसह 69, वासवदाने 6 चौकारांसह नाबाद 39, हार्विक देसाईने 3 चौकारांसह 22, चेतेश्वर पुजाराने 6 चौकारांसह 26, डी. जडेजाने 4 चौकारांसह 22 धावा जमविल्या. गुजराततर्फे चिंतन गजाने 4 तर जे. पटेल आणि सिद्धार्थ देसाई यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर गुजरातच्या पहिल्या डावात जयमीत पटेल आणि मनन हिंगरेजा यांनी शानदार अर्धशतके झळकवली. हिंगरेजाने 1 षटकार आणि 8 चौकारांसह 83 धावा जमविल्या. जयमीत पटेल 9 चौकारांसह 88 धावांवर खेळत आहे. यु. पटेल 1 षटकार आणि 4 चौकारांसह 29 धावांवर खेळत आहे. पांचाळने 25 धावा जमविल्या. चिराग जेनीने 2 तर उनादकट आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – सौराष्ट्र 72.1 षटकात 216 (चिराग जेनी 69, वासवदा नाबाद 39, चिंतन गजा 4-48), गुजरात प. डाव 95 षटकात 4 बाद 260 (मनन हिंगरेजा 83, जयमीत पटेल खेळत आहे 88, उर्विल पटेल खेळत आहे 29, चिराग जेनी 2-25).









