फातिमा नाव धारण करत नसरुल्लाहसोबत विवाह
वृत्तसंस्था/ पेशावर
फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी भारतातून पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूने आता तेथे धर्मांतर करत फातिमा हे नाव धारण केल्याचे वृत्त आहे. धर्मांतर करण्यासह तिने मित्र नसरुल्लाहसोबत विवाह केल्याचे समजते. अंजूने सोमवारी आपण व्हिसा कालावधी संपण्यापूर्वी भारतात परतणार असल्याचा दावा केला होता. अंजू ही पूर्वीपासून भारतात विवाहित असून तिला दोन मुले देखील आहेत. अंजू ही यापूर्वी ख्रिश्चनधर्मीय होती.
अंजू उर्फ फातिमाने जिल्हा न्यायालयात विवाहाची नोंदणी करत तेथे धर्मांतराची नोंद केली आहे. मालकुंड विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक नासिर महमूद दस्ती यांनी अंजू अन् नसरुल्लाह यांच्या विवाहाची पुष्टी दिली आहे. विवाहानंतर अंजूला पोलिसांच्या सुरक्षेत नसरुल्लाहच्या घरी पोहोचविण्यात आले.
तर दुसरीकडे नसरुल्लाहने अंजूसोबत विवाह झाला नसल्याचा दावा केला आहे. अंजूच्या सुरक्षेकरता आम्ही न्यायालयात गेलो होतो. अंजू विदेशी नागरिक असल्याने तिच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. विवाहासंबंधीचे वृत्त खोटे असून अफवा पसरविल्या जात आहेत. अंजूने होकार दर्शविला तरच विवाह होईल असे नसरुल्लाहने म्हटले आहे.
भारतात पतीकडून घटस्फोट घेतला आहे. स्वत:च्या प्रेमापोटी भारतातून पाकिस्तानात आली असून येथे आनंदाने राहत असल्याचे अंजूने पोलिसांना सांगितले आहे. अंजूच्या पाकिस्तान प्रवेशाची पूर्ण चौकशी झाली आहे. तिच्याकडील सर्व दस्तऐवज वैध असल्याची माहिती अपर दीर जिल्ह्याचे मुख्य पोलीस अधिकारी मुश्ताक खान यांनी दिली आहे.
अंजू ही भारतातील उत्तरप्रदेशच्या कैलोर येथील रहिवासी आहे. अंजू एका खासगी कंपनीत कार्यरत होती. 2007 साली तिचा अरविंदसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर अंजू राजस्थानच्या भिवाडी येथे पतीसोबत राहत होती. तिला दो मुले देखील आहेत. अंजू ही फेसबुकच्या माध्यमातून नसरुल्लाहच्या संपर्कात आली होती.