पाकिस्तानमधील ‘फेसबुक मित्र’ नसरुल्लाशी केला होता विवाह
वृत्तसंस्था/ वाघा बॉर्डर
पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडून भारत सोडून पाकिस्तानला गेलेली अंजू बुधवारी वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतली. सहा महिन्यांपूर्वी ती भारतातून पाकिस्तानात पोहोचली होती. पाकिस्तानात पोहोचल्यानंतर तिने आपला पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी लग्न केले होते.
34 वषीय अंजू जुलैमध्ये आपल्या फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. नंतर अंजूने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर नसरुल्लासोबत लग्न केल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले होते. विवाह करण्याबरोबरच अंजूने आपले नाव बदलून फातिमा केले होते. ऑगस्टमध्ये पाकिस्तानने अंजूचा व्हिसा कालावधी एक वर्षासाठी वाढवला होता. याचदरम्यान सप्टेंबरमध्ये आपली पत्नी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून ती आपल्या मुलांना खूप मिस करत असल्याचे अंजूचा पती नसरुल्ला याने सांगितले होते. तसेच अंजूचे मानसिक आरोग्य बिघडू नये अशी माझी इच्छा आहे. अंजूने आपल्या मुलांना भेटण्यासाठी तिच्या देशात जाणे चांगले आहे. पाकिस्तानात कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून ती परत जाणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते.
पतीला न सांगता पाकिस्तानात पोबारा
ऑगस्टमध्ये लग्नानंतर अंजू आणि नसरुल्ला पहिल्यांदा पेशावरमध्ये होते. तत्पूर्वी अंजू भारतीय रहिवासी होती. अंजूचा विवाह राजस्थानमधील अरविंदसोबत झाला होता. त्यांना 15 वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. आपण काही दिवसांसाठी जयपूरला जात असल्याचे तिने पती अरविंदला सांगितले होते. मात्र, नंतर ती पाकिस्तानात गेल्याचे तिच्या पतीला समजले होते. आता 5 महिने पाकिस्तानात राहिल्यानंतर अंज भारतात परतली आहे. अंजूला वाघा बॉर्डरवर सोडण्यासाठी तिचा पाकिस्तानी पती नसरुल्ला आला होता. अंजू आपल्या मुलांना भेटण्यासाठी भारतात जात असून ती लवकरच पाकिस्तानला परतणार असल्याचे त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.
…तर नव्या वादाची उत्पत्ती!
राजस्थानमध्ये अंजूचा भारतीय पती अरविंद आणि त्याची मुले तिच्यावर नाराज आहेत, तर कुटुंबातील इतर सदस्यांनी अंजूचे दुसरे लग्न चुकीचे असल्याचे सांगितले. अंजूला कोणत्याही परिस्थितीत मुलांना भेटू देणार नाही, असे अरविंदने आधीच जाहीर केले आहे. याबाबत त्याने स्थानिक पोलिसांनाही कळविले असल्यामुळे अंजूने मुलांना भेटण्याचा प्रयत्न केल्यास वाद निर्माण होऊ शकतो, असे मानले जात आहे.









