मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती : यापुढे भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य,परंपरा, पावित्र्य सांभाळून उत्सव साजरे व्हावे
पणजी : शिरगांव येथील श्री लईराईच्या जत्रोत्सवात घडलेली घटना ही प्रत्येकाला चटका लावणारी तसेच आमच्यासाठी डोळ्यांत अंजन घालणारी ठरली आहे. त्यातून बोध घेताना भविष्यात कोणत्याही जत्रा-उत्सवात अशी घटना घडणार नाही याची कठोर उपाययोजनांद्वारे खबरदारी घेण्यात येईल. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. तसेच कोणत्याही देवस्थानच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करता संबंधित समितीला विश्वासात घेऊन व प्रत्येकाच्या प्रथा, परंपरा आणि पावित्र्य सांभाळून उत्सव साजरे करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
काल मंगळवारी पर्वरी सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी मुख्य सचिव डॉ. बी. कंदवेलू यांचीही उपस्थिती होती. दि. 2 मे रोजी श्रिगांव जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला होता, तर अन्य 80 जण जखमी झाले होते. त्यानंतर या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘तथ्य शोधन’ समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला आहे. त्यावर मुख्यमंत्री पत्रकारांना माहिती देत होते. शिरगांव जत्रेच्या चेंगराचेंगरी चौकशी अहवालानुसार लवकरच संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
देवस्थान समितीचे सहकार्य नाही
समितीने सादर केलेल्या अहवालात चेंगराचेंगरीची कारणे स्पष्ट करताना देवस्थान समितीने अपेक्षित सहकार्य दिले नाही. बॅरिकेडस् घालण्याचीही तयारी दाखविली नाही. परिणामी गर्दी हाताळण्यास समितीही तेवढीच अपयशी ठरली, असे अहवालात म्हटले आहे.
विजेबाबत पंचायतीचा डोळेझाकपणा
सर्वात महत्वाचे म्हणजे पंचायतीनेही बेसुमार दुकानांना परवानगी दिली व डोळेझाक पद्धतीने वीज जोडणीसाठी ना हरकत दाखले दिले. त्याशिवाय काही धोंडगणांचे गैरवर्तन आदी कारणेही जबाबदार ठरल्याचे निरीक्षण नोंदविले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
वॉच टॉवर्स, ड्रोनचा वापर नाही
जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षेचे उपाय राबविण्यात हलगर्जीपणा दिसून आला. पोलिसांमध्येही समन्वयाचा अभाव दिसून आला. गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त पोलिस तैनात करण्यात आलेले असतानाही मोक्याच्या ठिकाणी बंदोबस्ताचा अभाव होता. वॉच टॉवर्स उभारले नाहीत, ड्रोनही वापरात आणले नाहीत, असे समितीने म्हटले आहे.
भविष्यात जत्रोsत्सवात कठोर उपाययोजना
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, भविष्यात होणाऱ्या प्रत्येक जत्रोsत्सवात कठोर उपाययोजना घेण्यात येतील, असे सांगितले. तसेच खास करून मोठ्या जत्रोत्सवांमध्ये कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी गर्दी व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येईल. अशा प्रत्येक जत्रोत्सवासाठी अन्य सर्व यंत्रणांच्या बरोबरीने एक नोडल अधिकारीही नियुक्ती करण्यात येईल, असे सांगितले.
रस्त्यांचे ऊंदीकरण, सपाटीकरण
दरम्यान, एका प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुढील जत्रोत्सवापूर्वी शिरगांवातील रस्त्यांचे ऊंदीकरण करण्यात येईल, तसेच खास करून चेंगराचेंगरी घडलेल्या ठिकाणची उतरण कापून सपाटीकरण करण्यात येईल, असे सांगितले. यासाठी प्रसंगी कठोर पावले उचलावी लागली तरी सरकारची तशी तयारी असेल, असेही ते म्हणाले.









