वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाच्या राजकारणातील उलथापालथ सुरूच आहे. जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदासाठी शर्यतीत असलेली अनेक नावे समोर आली होती. याचदरम्यान भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधानपदाच्या शर्ययीत मी नाही. लिबरल पार्टीचे नेतृत्व करण्याच्या शर्यतीत देखील मी नाही अशी घोषणा अनिता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे केली आहे. अनिता आनंद या आंsटारियोच्या ओकविले येथील खासदार असून त्यांनी आगामी निवडणुकीपर्यंत मतदारसंघातील लोकांची सेवा करणार असल्याचे म्हटले आहे.
ट्रुडो यांनी स्वत:च्या पुढील जीवनाचा ज्याप्रकारे निर्णय घेतला आहे, त्याचप्रकारे मी देखील पुढील वाटचालीविषयी विचार करत आहे. आगामी निवडणूक मी लढविणार नाही असे अनिता यांनी जाहीर केले आहे. तमिळ पिता आणि पंजाबी आईची मुलगी असलेल्या अनिता यांनी ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाचे विभाग सांभाळले होते. त्यांनी संरक्षण अन् सामाजिक सेवा यासारख्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली होती. संरक्षणमंत्री म्हणून अनिता यांनी रशियाच्या विरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रs उपलब्ध करविण्याच्या जागतिक प्रयत्नांचे नेतृत्व देखील त्यांनी केले होते.









