राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धा
वृत्तसंस्था/ डेहराडून
ऑलिम्पिकपटू अनिश भनवाला, सिफ्ट कौर सामरा आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेता उमामहेश मद्दिनेनी यांनी बुधवारी येथे पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर, महिलांच्या 50 मीटर 3 पी आणि 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये जेतेपद मिळविले. ग्रुप ‘अ‘ खेळाडूंसाठी राष्ट्रीय निवड चाचणी घेण्यात आली.
महाराणा प्रताप स्पोर्ट्स कॉलेजमधील त्रिशूल शूटिंग रेंजमध्ये या चाचण्या सुरू झाल्या असून अंतिम फेरीत अनिशने 33 गुण मिळवले तर आदर्श सिंगने 29 गुण घेत दुसरे स्थान मिळविले. नौदलाच्या प्रदीप सिंग शेखावतने 23 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. त्याआधी, अनिशने दुसऱ्या पात्रतेच्या टप्प्यात 289 गुण नोंदवले त्याआधी पहिल्या टप्प्यात त्याने 293 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला. एकूण 582 गुण त्याने नेंदवले. प्रदीपने 581 (290, 291) गुणांसह दुसरे स्थान पटकावले तर गुरमीत सिंगने 579 (289, 290) गुणांसह तिसरे स्थान पटकावले. हरसिमर सिंग रथ्था (577), नीरज कुमार (576) आणि आदर्श सिंग (574) यांनी उर्वरित स्थाने पटकावली.
म्युनिक येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात नुकत्याच कांस्यपदक जिंकणाऱ्या सिफ्ट कौर सामराने महिलांच्या 50 मीटर 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत 467.3 गुणांसह अव्वल स्थान पटकावत आपला दर्जा दाखवला, जो आकृती दहियापेक्षा 10.4 गुणांनी सरस होता. आकृतीने 456.9 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. पात्रता फेरीत 592 गुणांसह अव्वल स्थान पटकावल्यानंतर आशी चोक्सीने 443.9 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. पात्रता फेरीत सिफ्टने 591 गुणांसह आघाडी घेतली. आकृतीने 588 गुणांसह तिसरे स्थान पटकावले तर मेहुली घोष (588), आयुषी पोदार (587), विदर्ष के विनोद (586), वंशिका शाह (585) आणि निश्चल सिंग (585) यांनी अव्वल आठ क्रमांक पूर्ण केले. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत 252.2 गुणांसह उमामहेश मद्दिनेनीने रुद्रांक्ष पाटीलला मागे टाकले. रुद्रांक्षने 251.5 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. दिव्यांश पनवरने 230.1 गुणांसह तिसरे स्थान मिळवले.
पात्रता फेरीच्या सुरुवातीला स्थानिक मुलगा शौर्य सैनी आणि दिव्यांश पनवर यांनी 632.9 गुण मिळवले होते परंतु दिव्यांश पनवरने अधिक इनर 10 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. सतरा वर्षीय पार्थ राकेश मानेने 632.5 गुणांसह तिसरे स्थान पटकावले तर रुद्रांक्ष (631.9), पार्थ माखीजा (631.6), उमामहेश (630.9), संदीप सिंग (630.9) आणि विशाल सिंग (630.7) यांनी अव्वल आठ स्थान पटकावले.
महिलांची 25 मीटर पिस्तूल टी-3 आणि महिलांची 50 मीटर रायफल 3 पी टी-4 तसेच पुरुषांची 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल टी-4 स्टेज 1.
या चाचण्यांमुळे ऑगस्टमध्ये कझाकस्तानमध्ये होणाऱ्या 16 व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि सप्टेंबरमध्ये चीनमधील निंगबो येथे होणाऱ्या आयएसएसएफ विश्वचषकासाठी भारतीय नेमबाजी संघाला आकार मिळण्यास मदत होणार आहे.









