वृत्तसंस्था/ श्यामकेंट (कझाकस्तान)
सध्या येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनीश भनवालाने बुधवारी 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकून तो देशातील सर्वोत्तम रॅपिड फायर पिस्तूल नेमबाज का आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले. या 22 वर्षीय ऑलिंपियनने मिळविलेले 35 गुण चीनच्या सुवर्णविजेत्या सू लियानबोफानपेक्षा फक्त एका गुणाने कमी राहिले.
कोरियाच्या ली जेक्युनला कांस्यपदक मिळाले. पहिल्या चार मालिकांनंतर भारतीय खेळाडूकडे एका गुणाची आघाडी होती, पण त्यानंतर तो मागे पडला. स्पर्धेतील आणखी एक भारतीय आदर्श सिंग पाचव्या स्थानावर राहिला. 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील सुवर्णपदक विजेता असलेला भनवाला मंगळवारी 30 शॉट्सच्या फेरीत 290 गुणांसह सहाव्या स्थानावर राहिला होता. परंतु बुधवारी रॅपिड फायर फेरीत हरियाणाच्या या नेमबाजाने 293 गुणांची शानदार कामगिरी करत एकंदरित 583 गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली.
सहा जणांच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना भनवाला सू लियानबोफानविऊद्ध 18-17 असा. आघाडीवर होता. परंतु उर्वरित तीन मालिकांमध्ये पाच-पाच शॉट चुकल्याने त्याला 20 वर्षीय चिनी खेळाडूने पराभूत केले. पेरूतील लिमा येथे झालेल्या या वर्षीच्या विश्वचषकात जिंकलेले रौप्यपदक ही चिनी खेळाडूची तोवरची सर्वोत्तम कामगिरी होती. भनवालाने दोन वर्षांपूर्वी कोरियातील चांगवॉन येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. मात्र यावेळी त्यात त्याने सुधारणा घडली. मंगळवारी भनवाला (583), आदर्श सिंग (585) आणि नीरज कुमार (570) या त्रिकुटाने 1738 गुणांसह या स्पर्धेत सांघिक रौप्यपदक जिंकले होते आणि दक्षिण कोरियाने 1748 गुणांसह सुवर्णपदक जिंकले होते.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये समावेश नसलेल्या पुऊषांच्या 50 मीटर पिस्तूलमध्ये अमनप्रीत सिंग (543 गुण), योगेश कुमार (548) आणि रविंदर सिंग (542) यांचा समावेश असलेल्या संघाने रौप्यपदक जिंकले. त्यांनी एकूण 1633 गुण मिळवले. इराणने सुवर्णपदक जिंकताना एकूण 1652 गुण मिळवले, तर दक्षिण कोरियाने (1619 गुण) कांस्यपदक जिंकले. दुसरीकडे, पुऊषांच्या 50 मीटर पिस्तूलमधील अभिनव चौधरी (541), उमेश चौधरी (529) आणि मुकेश नेलावल्ली (523) या कनिष्ठ त्रिकुटाने दोन संघांच्या या स्पर्धेत एकूण 1593 गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. या ठिकाणी कझाकस्तानने (1580) दुसरे स्थान मिळवले.









