हवामान बदलाचा प्राण्यांवरही परिणाम होत असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. सीएबीआय रिह्यूजमध्ये प्रकाशित संशोधनासाठी प्राण्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अध्ययन करण्यात आले होते. तसेच त्यांचा आहार, वातावरण अन् वर्तनाचेही अध्ययन करण्यात आले. वाढत्या तापमानामुळे प्राण्यांनाही तणावाला सामोरे जावे लागत असल्याचे अध्ययनात आढळून आले. संशोधनानुसार हवामान बदलामुळे गायींची दूध देण्याची क्षमता 35 टक्क्यांनी कमी झाली आहे. अत्याधिक उष्णता ही हत्तींचा मृत्यू, श्वानांचे वजन वाढण्याचेही कारण मानले गेले आहे. हवामान बदलाचा प्रभाव पाहण्यासाठी वटवाघुळ, जेब्रफिश, बेडूक, कोआला, आफ्रिकन हत्ती, कोंबडी, पक्षी आणि गायींवर संशोधन झाले.
पक्ष्यांमध्ये क्षमता मर्यादित
पक्ष्यांमध्ये उष्णतेला नियंत्रित करण्याची क्षमता मर्यादित असते. कारण त्यांच्यात स्वेट ग्लँड (घामाच्या ग्रंथी) नसतात. पक्षी धापा टाकून स्वत:च्या हालचालींना मर्यादित करतात आणि अधिक पाणी पिऊ लागतात. अधिक तापमानामुळे कोंबडीच्या मांसाची गुणवत्ताही कमी झाली आहे. या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी कोंबड्यांना चार दिवसांपर्यंत उष्ण वातावरणात ठेवण्यात आले, यात त्यांच्यात नेक्रोसिसची प्रकरणे दिसून आली. या स्थितीत शरीरातील पेशी मृत होतात.
पाण्याअभावी हत्तींचा मृत्यू
तापमान वाढल्याने आफ्रिकन देशांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. तेथे पाण्याच्या कमतरतेमुळे हत्तींचा मृत्यू होत असल्याचे संशोधक डॉ. एडवर्ड नारायण यांनी सांगितले आहे. वर्ल्ड वेदर एट्रिब्युशनच्या अहवालानुसार पूर्व आफ्रिकेत दुष्काळ पडण्याची शक्यता 100 टक्क्यांनी वाढली आहे. अडीच वर्षांपासून आफ्रिकेत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून बहुतांश काळ उष्ण वातावरण राहिले आहे. यामुळे अनेक प्राण्यांचा मृत्यू ओढवला आहे.
कोआलाची संख्या घटतेय
हवामान बदलाचा प्रभाव कोआला प्राण्याच्या संख्येवरही दिसून आला आहे. उन्हाळ्यात कोआलाला स्वत:च्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अधिक ऊर्जेचा वापर करावा लागतो. ही ऊर्जा त्यांना यूकेलिप्टस वृक्षांच्या पानांपासून मिळते. हवामान बदलामुळे यूकेलिप्टस वृक्ष संपुष्टात येत आहेत. अशा स्थितीत कोआलांना अन्न मिळणार नाही आणि ते मरू लागतील. कोआला आणि यूकेलिप्टस वृक्ष ऑस्ट्रेलियात अधिक आढळून येतात.
श्वानांचे वाढतेय वजन
संशोधनानुसार अधिक उष्णता श्वानांच्या स्थुलत्वाचे कारण ठरत आहे. यामागील कारण देखील माणूसच आहे. संशोधनात ब्रिटनचे उदाहरण देण्यात आले. ब्रिटनमध्ये 50 टक्के श्वानांचे वजन सरासरीपेक्षा अधिक आहे. 87 टक्के लोकांनी उष्णतेमुळे स्वत:च्या श्वानांना वॉकसाठी घराबाहेर नेले नव्हते. यामुळे श्वानांमध्ये देखील आळशीपणा वाढतोय. उन्हाळ्यात श्वानांमधील चिडचिडेपणा वाढत असतो.









