उपचार, लसीकरणाची प्रात्यक्षिकांद्वारे माहिती
बेळगाव : जनावरांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी जिल्ह्यात 497 पशुसखींची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, या पशुसखींना पशुसंगोपन खात्यामार्फत प्रशिक्षण दिले जात आहे. जनावरांवर प्रथमोपचार कसे करावेत? आजारी जनावरांना कोणता आहार द्यावा? कृत्रिम गर्भधारणा, लसीकरण, उपचार आणि इतर बाबींची माहिती दिली जात आहे. त्यामुळे येत्या काळात पशुपालकांना पशुसखीच्या माध्यमातून वेळेत उपचार उपलब्ध होणार आहेत. पशुसंगोपन आणि पशुपालक यांच्यातील दुवा म्हणून पशुसखींकडे पाहिले जात आहे. आजारी जनावर, लसीकरण आणि जनावरांच्या इतर समस्या असल्यास संबंधित पशुवैद्याला माहिती देऊन वेळेत जनावरावर उपचार करणे हे पशुसखींचे काम आहे. शासनाने जिल्ह्यात 497 पशुसखींची नेमणूक केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला एक पशुसखी याप्रमाणे नियुक्ती झाली आहे.
जनावरांवर उपचार करताना पशुसखींनी कोणती दक्षता घ्यावी? उपचारापूर्वी जनावरांना दोरीच्या साहाय्याने कसे पाडावे? त्यानंतर प्रथमोपचार आणि उपचार कसे करावेत, याबाबत प्रात्यक्षिक दाखवून पशुसखींना मार्गदर्शन दिले जात आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या अगदी नगण्य आहे. त्यामुळे जनावरांना वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी काही वेळेला उपचारांअभावी जनावरे दगावण्याच्या घटना घडतात. जनावरांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी पशुसखींची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात जनावरांची संख्या 28 लाखांहून अधिक आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव, शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. अलीकडे जनावरांना विविध आजारांची लागण होऊ लागली आहे. गतवर्षीपासून लम्पी रोगाने हैदोस घातला आहे. या रोगाने जिल्ह्यात 25 हजारहून अधिक जनावरे दगावली आहेत. परिणामी पशुपालकांना मोठा फटका बसला आहे.









