नवी दिल्ली / वृत्तसंस्था
धर्माच्या नावावर किंवा धार्मिक कर्तव्य म्हणून पशुहत्या करण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पशू क्रूरता निवारण अधिनियमाच्या एका तरतुदीला या याचिकेत आव्हान देण्यात आले होते. प्राण्यांवर दया दाखविणे हे घटनेनुसार प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे धर्माच्या नावावर पशूहत्या करण्याचा अधिकारही त्याला रहात नाही. म्हणून यावर बंदी घालण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.
सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका गुणवत्तेच्या आधारावर नव्हे, तर ती सादर करण्यास अक्षम्य विलंब लावल्यासाठी फेटाळली आहे. निर्णयपत्रात तसे स्पष्ट करण्यात आले आहे. मागच्या वर्षी अलाहाबाद उच्च न्यायालयाने अशा स्वरुपाची याचिका फेटाळली होती. पण ही अपील याचिका सादर करण्यास 358 दिवसांचा विलंब लागला आहे, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे ती फेटाळण्यात आली.









