पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधण्याचे आवाहन
बेळगाव : शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत पशू किसान क्रेडिट कार्ड योजना राबविण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पशू वैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डची सुविधा पशुपालकांसाठी दिली आहे. या अंतर्गत दुग्ध व्यवसाय, शेळी, मेंढी पालन, कुक्कुट पालन, डुकर आणि इतर व्यवसाय करणाऱ्यांना अल्पकालीन आर्थिक साहाय्य केले जात आहे. यंदा पावसाअभावी चारा टंचाईचे संकट अधिक गडद होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत ही योजना शेतकऱ्यांना अधिक लाभदायक ठरणार आहे.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार पीक कर्जाप्रमाणेच पशुपालकांना कर्ज उपलब्ध होणार आहे. 3 लाखांपर्यंत कर्जाची मर्यादा राहणार आहे. शिवाय तीन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. संबंधित पशुपालकांनी आधारकार्ड, दोन छायाचित्रे, शिफारस पत्र आदी कागदपत्रे देणे आवश्यक आहे. पशुधनाची संख्या वाढावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. अलिकडे पशुपालन, कुक्कुटपालन, शेळी पालन आदी व्यवसाय वाढू लागले आहेत. अशांना ही योजना अधिक फायदेशीर ठरणार आहे. मागील दोन वर्षांत लम्पी आणि दुष्काळामुळे पशुपालक अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत किसान क्रेडिट कार्ड योजना पाठबळ देणार आहे.









