तालुक्यात एकूण 82,674 गायी-म्हशी : चाऱ्यासाठी जनावरांची ठिकठिकाणी भटकंती
वार्ताहर /खानापूर
गेल्या महिन्याभरापासून पावसाने ओढ दिल्याने जमिनीत ओलावा झाला नसल्याने ओला चारा उगवून येणे कठीण झाले आहे. त्यातच पावसाळ्यासाठी राखून ठेवण्यात आलेला सुका चाराही संपत चालला असल्याने जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील 82,674 गायी-म्हशीना चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. खानापूर तालुक्यातील 80 टक्के शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. मलप्रभा नदीकाठावरील गावातील शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील लोकही मोठ्याप्रमाणात पशुपालन करत असतात. दूध खरेदीसाठी विविध दूध डेअरींनी आपापल्या गावात शाखा काढल्या आहेत. त्या शाखेमार्फत शेतकऱ्यांकडील दूध सकाळ-संध्याकाळ संकलन करून टेम्पोने डेअरीपर्यंत नेले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचीही उत्तम सोय झाली आहे. शिवाय दरवर्षी दूध दरात काही प्रमाणात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होताना दिसत आहे. त्यातच आता प्रत्येक गावात पशुवैद्यकीय दवाखाने झाल्याने जनावरांच्या उपचारावरही योग्य प्रमाणात सोय होत असल्याने जनावरांचे आरोग्य चांगले आहे. खानापूर तालुक्यात 40135 गायी व 42539 म्हशी आहेत. ज्या भागात पाण्याची सोय आहे त्या भागात अधिक जनावरे आहेत. पारिश्वाड भागात सर्वाधिक 8027 जनावरे आहेत. तर गोधोळी भागात सर्वात कमी 3127 जनावरे आहेत. खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बोअरवेल खोदल्या आहेत. शेतीपिकाबरोबरच जनावरांसाठी पाण्याची सुविधा आपल्या शेतात त्यांनी केली आहे. शेतात जनावरांसाठी घरे बांधून शेतीबरोबरच आपला दुग्धव्यवसाय ते करत आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पशुपालनाच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे.
तालुक्यातील पशु केंद्रांतर्गत येणारी जनावरे (गायी व म्हशी)
- खानापूर 6498
- गर्लगुंजी 6442
- जांबोटी 6942
- संचारी केंद्र खानापूर 6942
- बिडी 5695
- गंदीगवाड 5470
- गोधोळी 3127
- इटगी 5506
- कणकुंबी 4266
- माडीगुंजी 3859
- नंदगड 6026
- हलशी 5005
- कक्केरी 6154
- लोंढा 4329
- पारिश्वाड 8027









