लवकरच आकडा जाहीर करणार, पहिल्यांदाच मोबाईल अॅपद्वारे गणती
बेळगाव : जनावरांची निर्दिष्ट संख्या समजावी यासाठी जिल्ह्यात 21 व्या पशुगणतीचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्यांदाच मोबाईल अॅपद्वारे पशुगणती झाली आहे. मात्र अद्याप याबाबतच्या अहवालाची प्रतीक्षा लागली आहे. अहवाल सादर झाल्यानंतरच जिल्ह्यातील एकूण जनावरांची संख्या समोर येणार आहे. शासनाच्या विविध योजना लसीकरण, प्रकल्प, दुधाचे उत्पादन, पशुधन आणि त्यांचे व्यवस्थापन यासाठी पशुगणती महत्त्वाची आहे. 2019 मध्ये शेवटची म्हणजेच 20 वी पशुगणती झाली होती. त्यानंतर आता सप्टेंबर 2024 पासून 21 व्या पशुगणतीला प्रारंभ झाला होता. घरोघरी जाऊन मोबाईल अॅपच्या माध्यमातून ही गणती करण्यात आली आहे. शहरातील 6 हजार तर ग्रामीण भागात 4500 कुटुंबीयांना भेटी देऊन पशुधनाची माहिती अॅपवर अपलोड करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक आणि पशुसखींची यासाठी मदत झाली आहे.
जिल्ह्यात 28 लाख जनावरांची संख्या
दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. मागील पशुगणतीनुसार जिल्ह्यात 28 लाख जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, घोडा, गाढव, मांजर, डुक्कर, कुत्रा आदींचा समावेश आहे. आता झालेल्या पशुगणतीमुळे या संख्येत घट झाली आहे की, वाढ झाली आहे, याबाबतचा आकडा लवकरच समोर येणार आहे. यासाठी जिल्ह्यात 247 पशुवैद्यकीय अधिकारी, 54 पर्यवेक्षकांनी काम केले आहे. ही पशुगणती फेब्रुवारी 2025 अखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र सुरुवातीला मोबाईल अॅप आणि सर्व्हर समस्येमुळे गणतीला विलंब झाला होता. तर दुर्गम आणि इतर ठिकाणी मोबाईल नेटवर्कमुळे गणतीचे काम लांबणीवर पडले होते. आता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे.
गोठ्यात जाऊन जीपीएसद्वारे पशुगणती
पहिल्यांदाच मोबाईल अॅपवरून पशुगणती करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय खात्याने लाईव्ह स्टॉक सेन्सस नावाने अॅप विकसित केला आहे. जनावरांच्या गोठ्यात जाऊन जीपीएसद्वारे पशुगणती केल्यामुळे अचूक माहिती संकलित झाली आहे.
पशुगणतीचा अंतिम अहवाल केंद्र देणार
जिल्ह्यात पशुगणतीचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी 247 पशुवैद्यकीय अधिकारी, 54 पर्यवेक्षकांच्या टीमने हे काम केले आहे. पशुगणतीचा अंतिम अहवाल केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे.
– डॉ. राजीव कुलेर सहसंचालक पशुसंगोपन खाते









