पशुसंगोपन खात्यातर्फे ऑनलाईन पद्धतीने गणती
प्रतिनिधी/ बेळगाव
पशुसंगोपन खात्यामार्फत 21 व्या पशुगणतीला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील विविध गावांतील जनावरांची गणती केली जात आहे. त्यामुळे एकूण जनावरांची निर्दिष्ट संख्या समजणार आहे. लम्पी आणि लाळ्या खुरकत लसीकरणामुळे पशुगणतीला विलंब झाला होता. आता प्रत्यक्ष गणतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. विशेषत: ही गणती ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या साहाय्यानेच केली जाणार आहे.
जनावरांतील साथीचे रोग, रोगावरील नियंत्रण, विविध योजना आणि प्रकल्प, दुधाचे उत्पादन, एकूण पशुधन, त्यांचे व्यवस्थापन या सर्व गोष्टी समजण्यासही मदत होणार आहे. विशेषत: घरोघरी जाऊन ही मोहीम राबविली जाणार आहे. 2019 मध्ये 20 वी पशुगणती झाली होती. त्यानुसार जिल्ह्यात 13 लाख मोठ्या जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल आणि इतर जनावरांचा समावेश आहे.
ऑक्टोबरदरम्यान या पशुगणतीची शासकीय स्तरावर सुरुवात झाली होती. मात्र, लसीकरणाच्या कारणामुळे ही गणती दोन महिने लांबणीवर पडली होती. आता प्रत्यक्ष जनावरांच्या गोठ्यात जाऊन जिल्ह्यातील एकूण पशुधन किती, याबाबतचा आकडाही लवकरच समोर येणार आहे. या कामासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांना गावोगावी नेमलेल्या पशुसखींची मदत मिळणार आहे. यापूर्वीच पशुवैद्यकीय खात्यामार्फत पशुगणतीबाबत प्रशिक्षण देऊन सर्व त्या सूचना करण्यात आल्या आहेत.









