ऑनलाईन टीम/तरुण भारत
ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल परब यांचे यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केलाय. दापोली येथील साई रिसॉर्ट बांधकामावेळी पर्यावरण संरक्षण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदानंद कदम यांच्यासह अनिल परबांचे जबाब नोंदवण्यात आले होते. (Shiv sena Uddhav Balasaheb Thackerays Leader Anil Parab Supporter Sadanand Kadam Has Been Summoned By Ed In Mumbai)
सदानंद कदम यांना पुढील आठवड्यात ईडीने त्यांच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दापोली येथील परब यांच्या साई रिसॅार्ट प्रकरणात कदम यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिसॉर्टच्या बांधकामाशी संबंधित महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायद्यांतर्गत पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच सदानंद कदम यांच्याविरोधात दुसरा एफआयआर नोंदवला होता. या एफआयआरनंतर ईडीने त्यामध्ये नमूद केलेल्या तपशीलांची तपासणी करण्याचा आणि कदम यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दापोलीमध्ये जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. २०२० मध्ये सदानंद कदम यांनी १ कोटी १० लाखाला जमीन खरेदी केली होती, त्या ठिकाणी रिसॅार्ट बांधण्यात आले, रिसॅार्ट बांधताना सीआरझेडच्या नियमाचं उल्लंघन झाले. त्यामुळे सरकारची फसवणूक झाल्याचा आरोप यापूर्वी आयकर विभागाने केला आहे.
शिवाय, येत्या १४ डिसेंबर रोजी अनिल परबांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. दापोली कोर्टाने साई रिसॉर्ट घोटाळ्यासंदर्भात अनिल परबांना समन्स बजावले आहे. पर्यावरण मंत्रालय, भारत सरकारने CRZ मध्ये बांधकाम केल्याप्रकरणी कोर्टात तक्रार दाखल केली होती. तो वेगळा खटला दापोली न्यायालयात सुरू आहे.