वृत्तसंस्था/ सामुकोव्ह (बल्गेरिया)
येथे सुरु असलेल्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या ग्रीकोरोमन मल्लांनी खास निराशा केली. भारतीय मल्ल अनिल मोरला कांस्यपदकाच्या लढतीमध्ये पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सुरजने ग्रीकोरोमन पद्धतीच्या कुस्तीमध्ये एकमेव कांस्यपदक मिळविले आहे. 55 किलो वजन गटातील झालेल्या कांस्यपदकासाठीच्या लढतीमध्ये जपानच्या मोरीशिताने अनिल मोरचा 10-7 अशा गुणांनी पराभव केला. मोरच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
या स्पर्धेमध्ये महिलांच्या विभागात भारतीय मल्लांनी दर्जेदार कामगिरी करत 7 पदकांसह सांघिक उपविजेतेपद मिळविले. तर पुरुषांच्या फ्री स्टाईल संघाला केवळ एकमेव रौप्यपदकावर समाधान मानावे लागत आहे. सुमीत मलिकने 57 किलो वजन गटात रौप्यपदक मिळविले. 77 किलो वजन गटात भारताच्या अमनने जपानच्या काडोडीचा 7-0 असा एकतर्फी पराभव केला. अमनला किरेल व्हॅलेसुकीकडून सरस तांत्रिक गुणावर पराभव पत्करावा लागला. 87 किलो गटात भारताच्या रोहितला रोमानियाच्या स्टेनने 4-6 असे पराभूत केले.









