वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उद्योगपती अनिल अंबानी यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने ‘फेमा’शी संबंधित एका प्रकरणासंदर्भात चौकशी केली. आपली जबानी नोंदवण्यासाठी अनिल अंबानी सकाळी 10 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले होते. ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यात अनिल अंबानी यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीशी संबंधित हे ताजे प्रकरण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा देत परकीय चलन कायद्याशी संबंधित प्रकरणात अनिल अंबानी यांची चौकशी केल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी ते 2020 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते. हे प्रकरण येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर यांच्याशी संबंधित होते. त्यानंतर ईडीने अनिल अंबानींची तब्बल नऊ तास चौकशी केली हेती. अंबानींच्या नऊ कंपन्यांनी येस बँकेकडून सुमारे 12,800 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्यावषी सप्टेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अंबानींना 420 कोटी रुपयांच्या कथित करचुकवेगिरीप्रकरणी दिलासा देताना प्राप्तिकर विभागाला त्यांच्याविरुद्ध कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे सांगितले होते.









