वृत्तसंस्था/कौलालंपूर
मलेशियात सुरू असलेल्या विश्व स्क्वॅश चॅम्पियनशिप आशिया विभाग पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताच्या तन्वी खन्ना आणि अनहात सिंग यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गुरुवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात तन्वी खन्नाने हाँगकाँगच्या टॉपसिडेड चिंग चेंगचा 3-1 (11-7, 11-8, 8-11, 12-10) अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. आता अनहातची उपांत्यपूर्व फेरीतील लढत हाँगकाँगच्या हेलन तेंगशी होणार आहे. दुसऱ्या एका सामन्यात अनहात सिंगने फिलीपिन्सच्या जेमिका अरीबेडोवर 3-0 (11-4, 11-5, 11-7) असा पराभव केला. त्याच प्रमाणे भारताच्या आकांक्षा साळुंखेने जपानच्या सुबीमोटोवर 3-0 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. पुरुषांच्या विभागात भारताच्या वीर चोटराणीने मलेशियाच्या हंगचा 3-0 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले.









