11 वर्षीय मुलगा आजीच्या घरी पोहोचण्यापूर्वीच बेशुद्ध
चीनमध्ये 11 वर्षीय मुलगा स्वतःच्या आईची तक्रार करण्यासाठी सायकलवरून आजीच्या घरी जाण्यासाठी बाहेर पडला. हा मुलगा सलग 24 तास सायकल चालवत होता. 130 किलोमीटर अंतरापर्यंत सायकल चालविल्यावर तो बेशुद्ध पडला. पोलिसांना हा मुलगा रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळून आला. ज्यानंतर त्याला पोलीस स्थानकात आणले गेले आणि त्याच्या आईवडिलांना कळविण्यात आले होते.
या मुलाचे आईसोबत भांडण झाले होते. यामुळे रागावलेला हा मुलगा मीजियांग येथील आजीच्या घरी जाण्यासाठी हँगजोऊ येथील स्वतःच्या घरातून निघाला होता. हँगजोऊ आणि मीजियांगमधील अंतर सुमारे 140 किलोमीटर इतके आहे. 130 किलोमीटरचा सायकलने प्रवास केल्यावर तो थकून गेला होता. महामार्गावरून जाणाऱया लोकांनी एक मुलगा बेशुद्धावस्थेत असल्याचे पोलिसांना कळविले हेते.

रात्रभर चालविली सायकल
या मुलाला उभेसुद्धा राहता येत नव्हते. आम्ही त्याला गाडीत बसवून पोलीस स्थानकात आणले होते. काहीवेळ आराम केल्यावर त्याने आपण आईची तक्रार करण्यासाठी आजीच्या घरी जात असल्याचे आम्हाला सांगितले. या मुलाला रस्ते माहित नव्हते, परंतु रस्त्यावरील फलक वाचून तो प्रवास करत होता. त्याने रात्रभर सायकल चालविली होती, घरातून बेड सोबत घेत तो बाहेर पडला होता अशी माहिती पोलीस अधिकाऱयाने दिली.
आजी पोहोचली पोलीस स्थानकात
मुलाला शुद्ध आल्यावर त्याच्या आईवडिलांबद्दल विचारणा करण्यात आली, त्याने घरचा संपर्क क्रमांक दिल्यावर पोलिसांनी त्याच्या पालकांना कळवून पोलीस स्थानकात बोलाविले होते. याचबरोबर मुलाच्या आजीनेही पोलीस स्थानकात धाव घेतली. माझ्या मुलाने आजीच्या घरी जाणार असल्याचे म्हटले होते, परंतु तो जाणार नाही अशी माझी समजूत होती असे या मुलाच्या आईने सांगितले. चीनमधील हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोक या मुलाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. रात्रीच्या वेळी सायकल चालविण्यासाठी हिंमत लागत असल्याचे एका युजरने म्हटले आहे.









