खंडित वीजपुरवठा-अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त : किमान आठ तास वीजपुरवठ्याची मागणी
वार्ताहर /काकती
काकती, गौडवाड, होनगा-बेन्नाळी येथील भातपिके पोसविण्याच्या वेळी सिंचनाअभावी धोक्यात आली आहेत. हेस्कॉमचा विद्युतपुरवठा खंडित, अघोषित भारनियमनामुळे काकती येथील हेस्कॉमच्या विभागीय कार्यालयाला शेतकऱ्यांनी शुक्रवारी धडक मोर्चाने जाऊन, अधिकाऱ्याला घेराव घालून संतापाचा आक्रोश व्यक्त केला आहे. किमान 8 तास विद्युतपुरवठ्याची मागणी यावेळी केली आहे. या भागातील सर्व शेतकऱ्यांनी या अवर्षणाच्या काळात विहीर आणि बोअरवेलचे पाणी भातपिकांना देऊन वाचविले आहे. विद्युतपुरवठा खंडित आणि भारनियमनामुळे सिंचनाअभावी भातपिके जगायची कशी, असा सवाल करून हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राघवेंद्र हुग्गूर यांना घेराव घालून जाब विचारला.
पुरेसा पाऊस नसल्याने भारनियमन
सध्या तीन तास थ्री फेज आणि दोन तास सिंगल फ्रेज विद्युतपुरवठा करण्याचा वरिष्ठांकडून आदेश आला आहे. विद्युतनिर्मिती करणाऱ्या केंद्रानाच पुरेसा पाऊस नसल्याने भारनियमन करणे भाग पडले आहे. शेतकऱ्यांची किमान 8 तास विद्युतपुरवठा शेतीपंपांना पुरविण्याची मागणीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रस्ताव मांडतो, असे सांगितले.
पिके वाया गेल्यास शेतकरी रस्त्यावर उतरणार
शेतकऱ्यांचे प्रतिनिधी रामा कडोलकर म्हणाले, हेस्कॉमने 3 व 2 तास शेतीपंपांना विद्युतपुरवठा दिल्यास तोंडाला आलेली पिके वाया जाणार आहेत. असे झाल्यास शेतकरी रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन पुन्हा छेडणार आहेत. आणि होणाऱ्या नुकसानीला हेस्कॉमला जबाबदार धरण्यात येणार आहे, असा इशारा देऊन लक्ष्मण पाटील, यल्लाप्पा आनंदाचे, बाबुराव पिंगट, सिदाप्पा गाडेकर, संजू सोमाई, सिदाप्पा मोळेराखी, श्रीपाद देसाई, बसवाणी निलजकर, कृष्णा मोळेराखी व सर्व शेतकरी वर्गाने एकत्र आक्रोश केला. शेतकरी शिष्टमंडळाने शेतकरी संघ काकती यांच्यावतीने हेस्कॉमचे अभियंता यांच्याकडे निवेदन दिले. सहानुभुतीने आपल्या निवेदनाचा फेरविचार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.









