सुदैवाने दोघे जण बचावले, आज पुन्हा मृतदेहाचा शोध घेणार
प्रतिनिधी/ बेळगाव
सुटी असल्याने मौजमजा करण्यासाठी अलतगा येथील क्वॉरीकडे तिघे मित्र गेले होते. यावेळी काही उशिरानंतर पोहायचे म्हणून एक जण क्वॉरीत उतरला. मात्र त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. त्याला इतर मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे त्या मित्राला ते वाचवू शकले नाहीत. शेवटी त्याचा बुडून मृत्यू झाला.
सतीश फकिराप्पा हणमण्णावर (वय 23, रा. भाग्यनगर, अनगोळ) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. सतीश आणि त्याचे मित्र अभिषेक संजय देसाई, मुकुंद सुनील आपटेकर (दोघेही रा. भाग्यनगर, अनगोळ) हे सुटी असल्यामुळे सर्वजण अलतगा क्वॉरीजवळ गेले होते. काहीवेळ मौजमजा केली. त्यानंतर सतीशने मी या क्वॉरीमध्ये पोहणार आहे, असे सांगितले. त्यावेळी त्याच्या मित्रांनी नको अशी विनंती केली. मात्र सतीश ऐकण्याच्या तयारीत नव्हता. कपडे काढून त्याने पोहण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी अधिक असल्याने तो बुडाला.
सतीशचे मित्र अभिषेक आणि मुकुंद यांनी आरडाओरड केली. त्याठिकाणी अनेक जण वाहने धुवत होते. मात्र कुणालाच काही करता आले नाही. या घटनेची माहिती काकती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला.
बेळगाव ग्रामीणचे एसीपी गिरीश, काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ, पोलीस विजय मानगावी हे दाखल झाले. याची माहिती अलतगा ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, राकेश धामणेकर, परशराम पाटील, वैजू बेन्नाळकर यांना समजताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेहाचा तपास सुरू केला होता. मात्र मृतदेह हाती लागला नव्हता.
आज पुन्हा तपास
क्वॉरीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी सतीशचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो हाती लागला नाही. या परिसरात अंधार असल्याने रात्री त्याचा शोध घेणे अशक्य झाले. त्यामुळे बुधवारी मृतदेहाचा शोध घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वीही घडली होती घटना
अलतगा येथील क्वॉरी ही अत्यंत धोकादायक आहे. यापूर्वीही परिसरातील क्वॉरींमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. खडीसाठी दगड काढले जातात. मात्र त्यानंतर योग्यप्रकारे बुजविले जात नाहीत. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. तेव्हा क्वॉरी चालकांना याबद्दल सूचना करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या.
गैरप्रकार करणाऱयांवर कारवाई
शहरातून तसेच इतर भागातून क्वॉरी परिसरात येऊन गैरप्रकार केले जात आहेत. मद्य ढोसणे, पाटर्य़ा आयोजित करणे, मौजमजा करणे असे प्रकार सुरू आहेत. मात्र यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. याचबरोबर महिलावर्गालाही याचा त्रास होत आहे. तेव्हा असे गैरप्रकार करणाऱयांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.









