साकोर्ड्यात तीन दिवसांपासून लोकांना प्रदूषित पाणी : संतप्त नागरिकांकडून ग्राम पंचायत मंडळ धारेवर
धारबांदोडा : साकोर्डा पंचायत क्षेत्रातून वाहणाऱ्या रगाडा नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने काल बुधवारी संतप्त नागरिकांनी पंचायत मंडळाची भेट घेऊन या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मागील तीन दिवसांपासून नदीचे पाणी प्रदूषित झाले असून रसायनमिश्रीत पाणी नदीत सोडले गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ज्याठिकाणी पाणी प्रदूषित झाले आहे, त्याच्या खालच्या भागात पाणी पुरवठा प्रकल्प आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना नळाद्वारे मिळणारे पाणी प्रदूषित येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
शुद्ध पाणीपुरवठा करावा
नळाद्वारे होणारा पाण्याचा पुरवठा त्वरित बंद करून याभागात टँकरद्वारे शुद्ध पाणी पुरवण्याची मागणी नागरिकांकडून पंचायत मंडळ, पाणी विभाग व अभियंत्याकडे करण्यात आली आहे.
पचायत मंडळाकडून पाहणी
तत्पूर्वी पंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत याच मुद्यावरून नागरिकांनी पंचायत मंडळाला फैलावर घेत घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार नदीच्या पात्रात पाहणी करण्यात आली. ज्यांनी हा प्रकार केलेला आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पंचायत मंडळाकडून देण्यात आले आहे.
कडक कारवाईची मागणी
रगाडा नदीच्या पात्रात मत्स्य पालन करणाऱ्या एका प्रकल्पाकडून हे प्रदूषित पाणी नदीत सोडण्यात आल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. त्याची चौकशी करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे. यासंबंधी बोलताना नीलेश मापारी म्हणाले की पिण्याचे पाणी हा नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत संवेदनशील विषय आहे. नळाद्वारे प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यास त्यावर पंचायत मंडळाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच या प्रकाराला कारणीभूत असलेल्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अजित मणेरकर, उमेश पाटील, नितू पेडणेकर यांनी पंचायत मंडळाला विविध प्रश्न विचारून धारेवर धरले. सरपंच प्रिया खांडेपारकर, उपसरपंच शिरीष देसाई, पंचसदस्य जितेंद्र कालेकर, महादेव शेटकर, गायत्री मापारी, संजना नार्वेकर व पंचायत सचिव सुषमा कुवळेकर तसेच पाणी विभागाचे अभियंते बाबशेट यांनी नागरिकांसोबत नदीची पाहणी केली.