आप’सोबत आघाडी वरिष्ठ नेत्यांना नामंजूर : एकत्र येणे अशक्य असल्याचे वक्तव्य
► वृत्तसंस्था/ अमृतसर
काँग्रेस नेतृत्वाने इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्स (इंडिया)मध्ये आम आदमी पक्षासोबत हातमिळवणी केली आहे. परंतु पंजाब काँग्रेसमधील नेत्यांमध्ये यावरून संताप आहे. पंजाबमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते या आघाडीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काँग्रेस अन् आपमधील आघाडी स्वीकारण्यास त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
पंजाबमध्ये आमची आम आदमी पक्षाविरोधातील लढाई सुरूच राहणार आहे. आम आदमी पक्षासोबत झालेली आघाडीच मूळात चुकीची असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात एकत्र येत 26 राजकीय पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली असून यात काँग्रेस अन् आप देखील सामील आहे.
पंजाबमध्ये एकत्र येणार नाही
आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केले आहे, आम्ही कधीच याची तक्रार केलेली नाही, परंतु आता आप सरकारने आता माजी उपमुख्यमंत्री ओ.पी. सोनी यांना अटक करविली आहे. आजारी असूनही सोनी यांना बळजबरीने तुरुंगात डांबण्यात आले आहे. सोनी यांचे काही भलंवाईट झाल्यास याकरता आम आदमी पक्ष जबाबदार असणार आहे. पंजाबमध्ये काँग्रेस अन् आम आदमी पक्ष एकत्र येणार नसल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी केली आहे.
आपसोबत आघाडी नको
पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते अन् काँग्रेस नेते प्रतापसिंह बाजवा यांनीही या आघाडीला विरोध दर्शविला आहे. काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत कुठलीच राजकीय आघाडी केलेली नाही, तसेच आप सोबत आघाडी करण्याच्या मी विरोधात आहे. आम आदमी पक्ष अन् त्यांच्या नेत्यांच्या मी विरोधात असल्याचे उद्गार बाजवा यांनी काढले आहेत.
काँग्रेसला सत्तारुढ पक्ष म्हणावे का?
पंजाब भाजप अध्यक्ष सुनील जाखड यांनी इंडिया आघाडीवरून काँग्रेस अन् आप नेते तसेच मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला आहे. जाखड यांनी काँग्रेसला यासंबंधी स्वत:ची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील आप सरकारच्या विरोधात आहे का? काँग्रेस आणि आप यांच्यातील आघाडीनंतर आता आम्ही काँग्रेसला सत्तारुढ पक्ष म्हणावे का विरोधी पक्ष अशी उपरोधिक विचारणा जाखड यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना लक्ष्य करत केली आहे.
काँग्रेसने सत्तारुढ बाकांवर बसावे
अकाली दलाचे नेते विक्रम मजीठिया यांनीही काँग्रेसवर शरसंधान केले. काँग्रेस आणि आप यांच्यात आता आघाडी झाली आहे. विधानसभेत काँग्रेसने आता आम आदमी पक्षाप्रमाणे सत्तारुढ बाकांवर बसावे. काँग्रेस आता विरोधी पक्ष नाही. काँग्रेसने आप सरकारसोबत मिळून पंजाबच्या लोकांचे प्रश्न सोडवावेत अशी उपरोधिक टीका मजीठिया यांनी केली आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून काँग्रेसची विरोधी पक्ष तर प्रताप सिंह बाजवा यांचा विरोधी पक्षनेत्याचा दर्जा काढून घ्यावी अशी मागणी केली आहे.









