मनपाच्या विरोधात लवकरच उच्च न्यायालयात याचिका : पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : शहर तसेच ग्रामीण भागामध्ये कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मानव हक्क वकील असोसिएशनने कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गांधीनगर, महांतेशनगर, उज्ज्वलनगर परिसरात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे आम्ही तक्रारी दिल्या आहेत. मात्र याबाबत कोणीच गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आता उच्च न्यायालयात लवकरच त्या विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना कुत्र्यांच्या हल्ल्याबाबत तुम्हीच हवा तो निर्णय घ्या, असा आदेश दिल्याची माहितीही अॅड. ए. डी. नदाफ यांनी दिली. उच्च न्यायालयानेही हल्ला करणाऱ्या कुत्र्यांचा स्थानिक संस्थांनी बंदोबस्त करावा, असा आदेश दिला आहे.
वेळ पडल्यास कुत्र्यांना पकडून जंगल भागामध्ये सोडावे तसेच त्यांचा बंदोबस्त करावा, असा आदेश दिला असताना मनपा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गेल्या महिन्यात 14 जणांवर कुत्र्याने हल्ला केला होता. त्यानंतर काही दिवसांतच गांधीनगर परिसरात दोन लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये दोन्ही मुले गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना घडल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या मुलांची साधी चौकशीही केली नाही. त्या मुलांचे वडील गरीब असून त्यांच्यावर उपचार करताना त्यांना मोठा आर्थिक ताण पडत आहे. तेव्हा तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शहरामध्ये प्रत्येक महिन्याला कुत्र्यांच्या हल्ल्यात 200 जण जखमी होत आहेत. संपूर्ण राज्यामध्ये बेळगाव शहरातच अधिक कुत्र्याचे हल्ले झाले आहेत. जवळपास वर्षाला 3 हजारांहून अधिक जण जखमी होत असताना मनपा दुर्लक्ष करत असल्यामुळे आम्ही त्या विरोधात याचिका दाखल करत असल्याचे सांगितले. यावेळी अॅड. एम. एम. जमादार, अॅड. एम. एस. कमलापूर, अॅड. आय. एम. शहापुरी, अॅड. डब्ल्यू. एम. शहापुरी उपस्थित होते.









