कानपूरमधील वृद्धाकडून प्रकार ः पत्नी, मुलगा, सुनेला ठेवले ओलीस
वृत्तसंस्था / कानपूर
उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये सुनेसोबत झालेल्या भांडणामुळे संतापलेल्या वृद्धाने 3 तासांपर्यंत खळबळ उडविली. 300 रुपयांवरून झालेल्या वादात वृद्धाने पत्नी, मुलगा-सुनेला खोलीत बंद केले आणि त्यांना आग लावून पेटवून देण्याची धमकी दिली. यामुळे भयभीत सुनेने त्वरित पोलिसांना माहिती दिली, घरगुती वाद समजून एक पोलीस अधिकारी आणि काही शिपाई वृद्धाच्या घरी पोहोचले. पोलिसांना पाहून बिथरलेल्या वृद्धाने छतावर चढून स्वतःच्या परवानायुक्त डबल बॅरल बंदुकीतून पोलिसांवर गोळीबार सुरू केला. सुमारे 3 तासांपर्यंत 40 ते 45 राउंड फायरिंग केले. यात पोलीस अधिकारी आणि दोन पोलीस जखमी झाले.
आर.के. दुबे (60 वर्षे) हे शेअरबाजाराशी संबंधित काम करतात. घरात स्वतःची पत्नी किरण दुबे, मोठा मुलगा सिद्धार्थ, सून भावना आणि दिव्यांग मुलगी चांदनीसोबत ते राहतात. त्यांचा कनिष्ठ पुत्र अन् सून वेगळे राहतात. दुबे यांचा रविवारी दुपारी सून भावनासोबत विजेच्या बिलाचे 300 रुपये देण्यावरून वाद झाला. या भांडणामुळे संतप्त दुबेंनी सून आणि मध्यस्थी करण्यास आलेली पत्नी तसेच मुलाला खोलीत बंद केले आणि आग लावून पूर्ण घर पेटवून देण्याची धमकी दिली.
खोलीत बंद सून भावनाने पोलिसांना फोन करून वाचवा, अन्यथा सासरे मारून टाकतील असे सांगितले. परंतु पोलिसांना पाहून दुबे यांचा संताप अधिकच वाढला. त्याहंनी घरातील डबल बॅरल बंदूक आणत गेटवर उभ्या असलेल्या पोलिसांवरच गोळीबार केला. यात तीन पोलीस जखमी झाले. स्थानिक पोलिसांनी त्वरित याची माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठ अधिकाऱयांनी वाढीव कुमकसोबत तेथे धाव घेतली. तरीही दुबे यांनी गोळीबार सुरूच ठेवला. पोलीस अधिकाऱयांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांची एक अट मान्य केल्याचे देखावा केल्यावर गोळीबार थांबला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करत बंदूक ताब्यात घेतले आहे.









