युद्धामुळे युक्रेनमधील स्थिती अत्यंत बिकट असताना हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीने युद्धग्रस्त युक्रेनमध्ये पोहोचून सर्वांना चकित केले आहे. युक्रेनच्या लवीव शहरात अँजेलिनाने काही मुलांसोबत वेळ घालविला आहे.
अँजेलिनाने लवीवमध्ये बेघर झालेले लोक आणि मुलांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे. अँजेलिना तेथे संयुक्त राष्ट्रसंघ शरणार्थी उच्चायुक्तांची विशेष प्रतिनिधी म्हणून पोहोचली होती. अभिनेत्रीला पाहून लोक आनंदी झाले आणि त्यांनी तिच्यासोबत सेल्फीही काढून घेतल्या. याचबरोबर अँजेलिनाने युक्रेनमधील वैद्यकीय स्वयंसेवकांची भेट घेतली आहे. युद्धग्रस्त लोकांपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचविणाऱया स्वयंसेवकांचे तिने प्रत्यक्ष भेटून कौतुक केले आहे.
डोनेटस्क क्षेत्रातून बाहेर काढण्यात आलेली अनाथ मुले आणि जखमींचीही भेट घेतली आहे. यापूर्वी तिने रोमचा दौरा करत एका रुग्णालयाला भेट दिली आहे. या रुग्णालयात अनेक शरणार्थी मुलांवर उपचार सुरू आहेत.









