बालचमूंचा किलबिलाट : सेविका-मदतनीसांची धांदल
बेळगाव : एक महिन्याच्या सुटीनंतर अंगणवाड्यांच्या शैक्षणिक वर्षाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. गुरुवारी पहिल्या दिवशी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी केंद्रांची स्वच्छता केली. शुक्रवारपासून पूर्ववतपणे बालचमूंचा किलबिलाट पाहावयास मिळणार आहे. जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. अलीकडे यामध्ये लहान-मोठ्या अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे. यंदा प्रथमच अंगणवाडी केंद्रांना एक महिन्याची उन्हाळी सुटी देण्यात आली होती. 15 एप्रिल ते 15 मे हा सुटीचा कालावधी संपून अंगणवाडी केंद्रे पूर्ववतपणे गजबजणार आहेत. त्याबरोबरच बालचमूंना पहिल्या दिवसापासूनच पोषण आहार आणि इतर सुविधाही पुरविल्या जाणार आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात अंगणवाडी केंद्रांच्या फक्त वेळेत बदल केला जात होता. सकाळच्या वेळेत अंगणवाडी केंद्रे भरविण्यात येत होती. मात्र, यंदा प्रथमच अंगणवाडी केंद्रांना एक महिन्याची सुटी दिली होती. पुन्हा अंगणवाडी केंद्राचे कामकाज पूर्ववत झाले आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांनाही अंगणवाडीच्या कारभारामध्ये रमावे लागणार आहे.









