पालकांची मागणी : वाढत्या उष्म्याचा परिणाम
बेळगाव : वाढत्या उन्हाने सर्वसामान्य जनता हैराण होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत अंगणवाडीच्या कामकाजामध्ये बदल करावा, अशी मागणी होत आहे. लहान बालकांच्या आरोग्याचा विचार करून अंगणवाडी सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणीही पालकांतून होऊ लागली आहे. दिवसेंदिवस उन्हाचे चटके वाढू लागले आहेत. त्यामुळे लहान बालकांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. अंगणवाड्या सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत भरवल्या जातात. यामध्ये बदल करून सकाळी 8 ते दुपारी दीड या वेळेत अंगणवाड्या भरवाव्यात, अशी मागणीही होऊ लागली आहे. जिल्ह्यात 5 हजार 331 अंगणवाडी केंद्रे आहेत. अलीकडे यामध्ये नवीन केंद्रांची भर पडली आहे. विजापूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडीचे कामकाज सकाळच्या सत्रामध्ये सुरू झाले आहे. त्याप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातही अंगणवाडी सकाळच्या सत्रातच सुरू कराव्यात. 16 एप्रिल ते 16 मे दरम्यान अंगणवाडी केंद्रांना उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, 16 एप्रिलपर्यंत अंगणवाडीचे कामकाज सकाळच्या सत्रातच सुरू ठेवावे. तसेच लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून अंगणवाड्या सकाळच्या सत्रातच भरवाव्यात, अशी मागणी होत आहे.









