बालक, गर्भवती महिला, बाळंतिणींच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
बेळगाव : मागील सहा महिन्यांपासून अंगणवाड्यांना देण्यात येणारा दूध पावडरचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे बालक, गर्भवती महिला आणि बाळंतिणींना पौष्टिक आहारापासून दूर राहावे लागत आहे. बालकांतील कुपोषितपणा कमी व्हावा, यासाठी दिली जाणारी दूध पावडर बंद झाल्याने पुन्हा कुपोषणाची भीती व्यक्त होत आहे. बालक, गर्भवती महिला आणि बाळंतिणींना पौष्टिक आहार उपलब्ध व्हावा. यासाठी क्षीरभाग्य योजनेंतर्गत दूध पावडरचा पुरवठा केला जात होता. मात्र आता हा पुरवठा बंद झाल्याने सकस आहारापासून दूर राहावे लागत आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या दुर्लक्षामुळे हा पुरवठा बंद झाला आहे. अंगणवाडीतील बालकांना, गर्भवती महिला व बाळंतिणींना दरमहा अर्धा किलो दूध पावडर दिली जात होती मात्र आता पुरवठाच बंद झाल्याने या लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले आहे. दूध पावडरचा पुरवठा बंद झाल्याने बालकांच्या सुदृढ आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होऊ लागला आहे तर काही ठिकाणी कुपोषण वाढत असल्याचेही समोर येऊ लागले आहे. जिल्ह्यात 5,331 अंगणवाडी केंद्रे आहेत. मात्र आता एकही अंगणवाडीला दूध पावडरचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे बालकांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
दुधाचा साठा कमी झाल्याने वितरण थांबले : आर. नागराज (सहसंचालक बालकल्याण खाते)
शासनाकडून येणारा दूध पावडरचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील दूध पावडरही थांबली आहे. मध्यंतरी दूध पावडरची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी इतर ठिकाणाहून मदत घेण्यात आली होती. दुधाचा साठा कमी झाल्याने दूध पावडर वितरण थांबले आहे.









