स्वयंपाकाच्या साहित्याचा पुरवठा थांबला : बालक-गर्भवती महिलांवर परिणाम
प्रतिनिधी/ बेळगाव
अंगणवाडी केंद्रांमध्ये बालक आणि गर्भवती महिलांना पौष्टिक आहार उपलब्ध व्हावा यासाठी भाजीपाला, मोड आलेले कडधान्य, दूध, खिचडी, लाडू, चिक्की दिली जात होती. मात्र आता भाजीपाला आणि कडधान्य आहारातून गायब झाले आहे. त्यामुळे महिला आणि बालकांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सरकारने बालकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बाजरीचे लाडू देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र अद्यापही बालकांपर्यंत बाजरीचे लाडू पोहोचले नाहीत.
अंगणवाडीतील बालकांसह गर्भवती महिलांना स्वयंपाकासाठी तेल आणि भाजीपाला दिला जात होता. मात्र आता भाजीपाला आणि तेलाचा पुरवठाही थांबला आहे. केवळ आमटीसाठी डाळी दिल्या जात आहेत. त्यामुळे स्वयंपाक कसा करायचा? असा प्रश्नही अंगणवाडी मदतनीसांसमोर पडला आहे. शासनाकडून अंगणवाडी केंद्रांना सुरळीत आहाराचा पुरवठा होईनासा झाला आहे. शिवाय आहारातून बरेचसे पदार्थ गायब झाले आहेत. त्यामुळे बालक आणि गर्भवतींना पौष्टिक आहारापासून वंचित रहावे लागत आहे.
बालकांना प्रथिने, कॅलरीज मिळावीत, यासाठी स्वयंपाकामध्ये विविध आहारांचा समावेश करण्यात आला होता. मात्र अलीकडे बरेचसे पदार्थ आहारातून लुप्त झाले आहेत. त्यामुळे बालकांना केवळ भात, आमटी आणि अंड्यांवर समाधान मानावे लागत आहे. भाज्या आणि इतर आहारासाठी अनुदान मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पौष्टिक आहारापासून दूर रहावे लागत आहे. एकीकडे शासन गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्यासाठी लाखो रुपये खर्ची घालत आहे. तर दुसरीकडे अंगणवाडीतून सकस आहार मिळत नसल्याने बालक आणि गर्भवती महिलांच्या पोषण आहाराबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने बालकांच्या पोषण आहारासाठी बाजरीचे लाडू देण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप आहारामध्ये बाजरीचे लाडू दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अंगणवाड्याही लाडूच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात मागील दोन ते तीन महिन्यांपासून स्वयंपाकाच्या साहित्याचा पुरवठा योग्यप्रकारे होत नसल्याने अंगणवाडींसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. याचा परिणाम बालक आणि गर्भवती महिलांवर होऊ लागला आहे.
दूध पावडरही बंद
अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध पावडर दिली जात होती. मात्र केएमएफने सुधारीत दरासाठी दूध पावडरचा पुरवठा बंद केला आहे. सरकारने केएमएफला सूचना करून दूध पावडर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही अंगणवाड्यांना दूध पावडरचा पुरवठा झालेला नाही.









