बहुतांशी केंद्रांमध्ये पाण्याची समस्या : बालकांच्या आरोग्याबाबत भीती : महिला,बाल कल्याण खात्याने पाण्याची सोय करण्याची आवश्यकता
बेळगाव : देशाचे भविष्य ठरविणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. बहुतांशी अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील अंगणवाड्या शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याचे दिसत आहे. याबाबत महिला व बाल कल्याण खाते गांभीर्य घेणार का हेच पहावे लागणार आहे.जिल्ह्यात 5531 अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यापैकी काही अंगणवाडी केंद्रे ही भाडोत्री तत्त्वावर आहेत. मात्र बहुतांशी अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याचे समोर आले आहे. पाण्यासाठी अंगणवाडी सेविकांना धडपड करावी लागत आहे. कधी कधी मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे.
ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रे सार्वजनिक विहिरी आणि कूपनलिकेवर अवलंबून आहेत. तर काही वेळेला मिळेल ते पाणी पिण्याची वेळ चिमुरड्यांवर येऊ लागली आहे. मात्र सद्यस्थितीत काविळ आणि इतर आजार फैलावू लागले आहेत. त्यामुळे बालकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.अंगणवाडी केंद्रांना जलजीवन योजनेंतर्गत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र अद्याप या आश्वासनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांना शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. केंद्र सरकारकडून गावो-गावी जलजीवन योजनेंतर्गत घरोघरी नळाची जोडणी करण्यात आली आहे. याबरोबर अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र नळाची जोडणी करण्यात येणार होती. काही ठिकाणी ही योजना राबविण्यात आली. मात्र नळांना पाणीच नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांतील पाण्याचा प्रश्न कायम आहे.
अंगणवाडी केंद्रांना शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न
महिला व बाल कल्याण खात्यातर्फे अंगणवाडी पेंद्रांना शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जलजीवन योजनेंतर्गत सर्व अंगणवाड्यांना स्वतंत्र नळ जोडणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी अडचणी आहेत. त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
– नागराज आर., सहसंचालक महिला व बाल कल्याण खाते









