कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात राबवलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहीणींनी महायुतीला भरभरुन मताचे दान दिले. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आले. या लाडक्या बहीणींचे ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मोठी मदत झाली. अल्प कालावधीत अर्ज भरण्याचे मोठे काम अंगणवाडी सेविकांनी केले आहे. यामुळे शासनाने त्यांची दखल घेत प्रती अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा विचार केला आहे. त्याप्रमाणे बुधवारी दिवसभरात राज्यातील अंगणवाडी सेविकांची माहिती मागवली आहे. एका अंगणवाडी सेविकेमुळे किमान चार ते पाच हजार रुपये मिळणार असल्यामुळे अंगणवाडी सेविकांही खूष होणार आहेत.
ऐन दसरा व दिवाळी सणात खात्यावर पैसे आल्याने लाडक्या बहीणींमध्ये आनंदाचे वातावरण राहिले. कोल्हापूर जिल्ह्यात 10 लाख 77 हजार 585 लाडक्या बहीणींना या योजनेचे पैसे मिळाले.
लाडकी बहीण योजना यशस्वी होण्यामागे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मुख्य सेविका यांचे मोठे कष्ट आहेत. दारोदारी फिरुन त्यांनी लाडक्या बहीणींचे अर्ज भरुन घेतले. काहीवेळा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्यांना महिलांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. यामुळे अंगणवाडी सेविकांना त्रासही झाला. मात्र ही योजना राज्यात यशस्वी झाली असून यामध्ये अंगणवाडी सेविकांचा मोलाचा वाटा राहिला आहे. अर्ज भरण्याचे वेगळे मानधन मिळावे अशी त्यावेळी अंगणवाडी सेविकांची चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी ही चर्चा काहीशी मागे पडली होती. आता लाडक्या बहीणींच्या मतांमुळे पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आल्याने अर्ज भरुन घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रती अर्ज 50 रुपये देण्याचा विचार शासन करत आहे.यासाठी शासनाने माहिती मागवली आहे. 26 डिसेंबर रोजी महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी राज्यातील सर्व महिला व बालविकास अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फ्रन्सदद्वारे संपर्क साधत अंगणवाडी सेविकांची यादी मागवली. काही दिवसात ही यादी तयार करुन त्याची पडाताळणी होईल. त्यानंतर ही यादी वित्त विभागाला पाठवण्यात येणार आहे. वित्त विभागाकडून शासनाला पाठवून मंजुरी मिळाल्यावर अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामाची पोहोचपावती मिळणार आहे.यामुळे अंगणवाडी सेविकाही खूष होणार आहेत.
शासन आदेश आहे,पैसे द्यावे लागतील
लाडक्या बहीणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थ्यामागे 50 रुपये देण्याचा शासन आदेश आहे.मात्र पैसे अद्याप तरी मिळाले नाहीत.अंगणवाडी सेविकांनी रात्री अपरात्री लाडक्या बहीणींचे अर्ज भरले आहेत.ऑनलाईन आणि ऑफलाईन असे अर्ज भरले आहेत.या कामाचा अंगणवाडी सेविकांना त्रास सहन करावा लागला आहे.जिल्ह्यात जवळपास 8 ते 9 हजार अंगणवाडी सेविकांची संख्या असून त्यांना कामाचे पैसे मिळावेत.
सुवर्णा तळेकर– कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ








