वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी कोंडुसकोप येथे आंदोलन : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी समस्या घेतल्या समजून
बेळगाव : गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी साहाय्यिका व मदतनिसांना 3 व 4 श्रेणीमध्ये कायमस्वरुपी करा, मासिक किमान 26 हजार वेतन द्या, निवृत्तीनंतर दहा हजार रुपये मासिक पेन्शन द्या, अंगणवाड्यांना सुरू केलेले एलकेजी, युकेजी वर्ग बंद करा, अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा पुरवा, रिक्त साहाय्यिका आणि मदतनिसांच्या जागा तातडीने भरा, आदी मागण्यांसाठी बुधवारी कोंडुसकोप येथील आंदोलनस्थळी राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या अंगणवाडी साहाय्यिका आणि मदतनिसांनी आंदोलन छेडले. या आंदोलनाला महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट देऊन अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.
निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे अंगणवाडी सेविकांसमोर अडचणी
एकात्मिक बालविकास योजना सुरू होऊन 50 वर्षे उलटली तरी अद्याप अंगणवाड्यांना पोषण आहार आणि शिक्षणाच्या सुविधा मिळत नाहीत. मतदान कार्ड, आरोग्याच्या सुविधा आणि इतर कामांची जबाबदारी असणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याबरोबर अंगणवाडी केंद्रांमध्ये निकृष्ट दर्जाच्या आहाराचे वितरण होत असल्याने अंगणवाडी सेविकांसमोर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. बालकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अंगणवाडी केंद्रांना सकस आणि दर्जेदार आहार साहित्य पुरवावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्या सेविकांनी केली आहे. काँग्रेस सरकारने अंगणवाडी सेविकांना सहावी गॅरंटी म्हणून वेतनात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार सत्तेत येऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अंगणवाडी सेविकांना दिलेल्या सहाव्या गॅरंटीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सत्तेतील सरकार अंगणवाडी सेविकांना सहावी गॅरंटी कधी लागू करणार, असा प्रश्नही आंदोलनकर्त्या सेविकांनी केला. या आंदोलनामुळे राज्याच्या विविध भागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.









