शिशुवर्ग सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राज्य सरकारने सरकारी शाळांच्या आवारात एलकेजी व युकेजी हे शिशुवर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, याचा परिणाम अंगणवाड्यांवर होणार असून सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशनतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये बेळगाव तालुक्यातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी व साहाय्यिका सहभागी झाल्या होत्या. कर्नाटक राज्य सरकारने सत्तेत येताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. खानापूर येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेस सरकारची सहावी गॅरंटी स्कीम म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 15 हजार तर साहाय्यिकांना 10 हजार रुपये मानधन वाढविण्याची घोषणा केली होती. याचबरोबर निवृत्तीनंतर 3 लाख रुपये देऊ, असे आश्वासनही दिले होते. परंतु, अद्याप सरकारने कोणतीही हालचाल केलेली नाही. यावर्षी राज्य सरकारने काही निवडक शाळांमध्ये एलकेजी-युकेजीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविकांना शिक्षणासोबतच इतर कामेही करावी लागतात. त्यामुळे सरकारने एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अंगणवाडी कर्मचारी व साहाय्यिकांनी संपूर्ण राज्यभर शुक्रवारी आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी संघटनेचे प्रमुख माजी महापौर नागेश सातेरी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.









