जिल्ह्यातील अनेक कर्मचारी होणारी सहभागी, प्रलंबित मागण्यांसाठी लढा सुरूच
चिपळूण
आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने ३ मार्च रोजी आझाद मैदान येथे मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. त्यात जिल्ह्यातील अनेक कर्मचारी सहभागी होणार आहेत.
याबाबत समितीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने लढा देऊनही अर्धवटच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे दिलेल्या आश्वासनानुसार सेविका, मदतनिस यांना पूर्ण ५ हजार व ३ हजार ऊपये मानधन वाढ मिळावी, प्रोत्साहन भत्त्याचे मानधनात ऊपांतर करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅच्युईटी, मासिक पेन्शन योजना लागू करावी, उच्च न्यायालयाच्या निकालानुसार २०२२ पूर्वी लागलेल्या सर्व मदतनीस यांची सेविकापदी थेट नियुक्ती करावी, तोपर्यंत बाहेरून भरती करू नये, २ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या मदतनीस उपलब्ध नसल्यास बाहेरून भरती न करता २ वर्षांच्या आतील मदतनिसांची नियुक्ती करावी, वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या मदतनिसांची पदोन्नती नाकारू नये, सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीसाठीचे निकष बदलून जुन्या सेविकांना २००२ च्या परित्रकानुसार १० वी पास व ५५ वर्ष वयोमर्यादेचे निकष लावून संधी उपलब्ध करून द्यावी, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सेविका, मदतनीसांच्या बदलीचे धोरण निश्चित करावे आदी मांगण्यासाठी हा मोर्चा असल्याचे नमूद केले आहे. हा मोर्चा समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल पऊळेकर, भगवान देशमुख, जीवन सुरूडे, जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे.








