10 जुलै रोजी आंदोलन : हॅंग-तांत्रिक अडचणींमुळे मोबाईल परत करण्याचा निर्णय
बेळगाव : रेंज, रिचार्ज, हॅंग आणि तांत्रिक अडचणींमुळे मोबाईल कुचकामी ठरले आहेत. याबाबत अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून येत्या 10 रोजी आंदोलन छेडून स्मार्ट मोबाईल परत करण्याचा निर्णय सेविकांनी घेतला आहे. अंगणवाड्यांचा कारभार ऑनलाईन पद्धतीने सुरळीत चालावा, यासाठी शासनाने प्रत्येक सेविकेला स्मार्ट मोबाईल फोन दिला. जिल्ह्यातील 65,991 सेविकांना सॅमसंग गॅलक्सी कंपनीचे मोबाईल पुरविण्यात आले आहेत. मात्र काही भागात या फोनना रेंज मिळत नसल्याने ऑफलाईन पद्धतीने कारभार सुरू आहे. तर काही अंगणवाड्यांमध्ये मोबाईल हँग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर शासनाकडून या मोबाईलचे वेळेवर रिचार्ज केले जात नाही. त्यामुळे कामाअभावी हे मोबाईल आता कुचकामी ठरू लागले आहेत. त्यातच अंगणवाडी सेविकांवर सरकारी कामांचा अतिरिक्त ताण वाढू लागला आहे. त्यामुळे वापराविना बंद असलेले मोबाईल परत करण्याचा निर्णय सेविकांनी घेतला आहे.
सीडीपीओ, सुपरवायझर आणि अंगणवाडी सेविकांचे काम जलदगतीने व्हावे, या दृष्टिकोनातून महिला बालकल्याण खात्याने ही सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, विविध कारणांमुळे मोबाईल बंद असल्याने कामकाज ऑफलाईन पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांची संख्या, हजर मुले, आहार सामग्री आणि गर्भवती महिलांची माहिती ऑनलाईन पद्धतीने संकलित केली जाते. मात्र सध्या मोबाईल बंद असल्याने हा सर्व डाटा ऑफलाईन पद्धतीने नोंद करावा लागत आहे. संपूर्ण अंगणवाडीतील डाटा वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावा, यासाठी हे स्मार्टफोन देण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी रेंजचा अभाव तर काही ठिकाणी हँग होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापराविना पडून असल्याचे दिसत आहेत. दैनंदिन समस्येला कंटाळून काही सेविकांनी ऑफलाईन पद्धतीनेच कारभार सुरू ठेवला आहे.
अंगणवाडी सेविकांवर समीक्षा सर्व्हेचा ताण…
अंगणवाडी सेविकांवर समीक्षा सर्व्हेची जबाबदारी देण्यात आली आहे. या अतिरिक्त ताणामुळे सेविका अडचणीत सापडल्या आहेत. अंगणवाडी सेविकांवर लादण्यात आलेला समीक्षा सर्व्हेचा आदेश रद्द करावा, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. या सर्व्हेमुळे दैनंदिन कामकाजात अडचणी येऊन कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: शहरात आशा कार्यकर्त्या नसल्याने या सर्व्हेचे काम कठीण झाले आहे.









