आप्पाचीवाडी अंधार लक्ष्मीजवळील घटना : भरधाव कारची दुचाकीला धडक
कोगनोळी : कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला खाली कोसळली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील अंधार लक्ष्मीजवळ सोमवार दि. 26 रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास घडला. अंजली गोपाळ माळी (वय 55, रा. आप्पाचीवाडी) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे, तर त्यांचे पती गोपाळ शंकर माळी (वय 65, रा. आप्पाचीवाडी) किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती अशी की, अंजली माळी या अंगणवाडी सेविका असून त्यांचे पती निवृत्त शिक्षक गोपाळ माळी यांच्या दुचाकी (क्र. एमएच 09 डीएन 3162) वरून आप्पाचीवाडीहून राष्ट्रीय महामार्गाकडे चालले होते.
याचदरम्यान अक्षय प्रदीप गावडे (वय 35, रा. कोलारवाडी, ता. आंबेवाडी, जि. पुणे) हे चालवत असलेल्या कारने (एमएच 14 एलपी 0838) पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना निपाणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून प्रकृती गंभीर असल्याने चिकोडी येथील रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी.एस.तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार शिवराज नाईकवाडी यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. या अपघाताबाबतची फिर्याद गोपाळ माळी यांनी निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली आहे. मयत अंजली माळी यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. या घटनेमुळे आप्पाचीवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









