कित्तूर चन्नम्मा चौक येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन : खासदारांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱयांनी खासदार मंगला अंगडी यांना निवेदन दिले. कित्तूर चन्नम्मा चौक येथे केंद्रसरकार विरोधात तीव्र निदर्शने करून त्यानंतर खासदारांच्या काडा कार्यालयावर मोर्चाने जाऊन निवेदन देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचारी गेली अनेक वर्षे लहान मुलांना शिक्षण, पौष्टीक आहार, याचबरोबर घरगुती महिलांना पौष्टीक आहार, तसेच आरोग्य विभागातील विविध कामे करत आहेत. असे असताना केंदसरकार आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत अंगणवाडी कर्मचाऱयांनी हा मोर्चा काढला.
कर्मचाऱयांना भविष्य निर्वाह निधी, त्यांच्या मानधनात वाढ करावी, किमान वेतन लागू करावे, योग्य वेळेत भत्ते द्यावेत, यासह इतर मागण्या त्यांनी केल्या आहेत. सध्या देण्यात येणारे वेतन हे तुटपुंजे आहे. त्यामुळे त्यावर उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. तेव्हा याबाबत लोकसभेमध्ये खासदार मंगला अंगडी यांनी आमचे म्हणणे मांडावे आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी मंदा नेवगी, जी. एम. जैनेखान, दोड्डवा पुजेरी, सरस्वती माळशेट्टी, मुनीरा मुल्ला, विजया कलादगी यांच्यासह जिल्हय़ातील अंगणवाडी कर्मचारी महिला उपस्थित होत्या.









